CM in Akola | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांकडून सामूहिक शेतीचा कानमंत्र 

श्रीकांत पाचकवडे 
शनिवार, 6 मे 2017

दोन, तीन एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतमालाचा खर्चही निघत नाही. सामूहिक गट शेती करून आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेती करण्याला प्राधान्य द्यावे, सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देऊन तुमच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

अकोला : दोन, तीन एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतमालाचा खर्चही निघत नाही. सामूहिक गट शेती करून आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेती करण्याला प्राधान्य द्यावे, सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देऊन तुमच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

खारपट्टा क्षेत्रातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्य शासन पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील गाडेगाव बु. येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावातील जलसंधारणाची जी विविध कामे सुरू आहेत त्या कामांची पाहणी केली. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार संजय कुटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणाची कामे पाहून आनंद व्यक्त केला. खारपाण पट्ट्यातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपीकता वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाण पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य शासन राबवीत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना नीट शेती करता यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागेल त्याला शेततळे योजना सरकार प्रभावीपणे राबवीत आहे. सिंचन वाढले तर पीक चांगले येऊन महाराष्ट्र सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. सामूहिक गट शेती फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेती करून आपल्या उत्पन्नात पहिल्याच वर्षी दुप्पट- तिप्पट वाढ करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

या वेळी गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी जलसंधारणाची झालेली कामे प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जेव्हा गावातील लोक आपले भाग्य आपल्यालाच बदलायचे आहे, याचा निर्णय घेतात, तेव्हाच अशी कामे होऊ शकतात. मी तुम्हाला खात्री देतो की, अशा प्रत्येक चांगल्या कामात सरकार एक मित्र म्हणून तुमच्यासोबत आहे. आपण आजवर निसर्गाकडून सातत्याने काही ना काही घेत राहिलो आहे.पण, आता निसर्गाला परत करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले. 

संबंधित लेख