Clever Shingane keeps all options open for elections | Sarkarnama

चाणाक्ष शिंगणेंचा दोन्ही तबल्यांवर हात !

अरूण जैन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

दोन्ही काॅग्रेसऐवजी स्वाभिमानीला जागा सुटल्यास काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी डाॅ. शिंगणेंनी पर्याय म्हणून विधानसभेच्या तबल्यावरही एक हात ठेवलेला आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या डाॅ. राजेंद्र शिंगणे यांना आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रोजेक्ट करण्याची तयारी सुरू आहे. मात्र ऐनवेळी काही बदल झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातही त्यांना उतरावे लागू शकते. त्यामुळे सध्यातरी त्यांचे हात लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही तबल्यांवर दिसत आहेत. 

लोकसभेच्या निवडणुकीत काॅग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊन समविचारी पक्षांनी सोबत येतील अशा शक्यता आज तरी व्यक्त होत आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यावर राष्ट्रवादीच्या ताब्यात आला होता. 2009 च्या निवडणुकीत डाॅ. राजेंद्र शिंगणे व 2014 मध्ये माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी निवडणूक लढविली. दोन्ही वेळा राष्ट्रवादीला विजय मिळविता आला नाही. परंतु आपणच हा मतदारसंघ लढविण्याचे पक्षाचे धोरण कायम आहे. 

गेल्या दोन्ही वेळा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धूळ चारली. मात्र 2009 मध्ये आमदार असलेल्या प्रतापरावांचा मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि सहानुभूतीच्या बळावर त्यांनी विजय मिळवला. तर गेल्यावेळी मोदी लाटेत त्यांची नौका पार झाली. असो.

यावेळी मात्र परिस्थिती फारच वेगळी आहे. लाट तर नक्कीच नाही. जनता त्रस्त आहे. परिणामी समविचारी विरोधकांच्या एकजुटीतून आपण बाजी मारून नेऊ असा विश्वास राष्ट्रवादीला आहे. त्या दृष्टीने डाॅ. शिंगणे यांनी जिल्हाभरात संपर्क वाढविण्यासाठी सुरवात केली आहे. विशेषतः प्रतापरावांच्या मेहकरवर त्यांचे विशेष लक्ष आहे.

जिल्ह्यातील इतर भागाकडे लक्ष ठेवताना आपल्या सिंदखेडराजाकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही ते काळजी घेताना दिसतात. लोकसभेसाठी प्रतापराव व विधानसभेसाठी डाॅ. शशिकांत खेडेकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीत.  

लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील दोन्ही काॅग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीचीही बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्यासाठी आग्रही भूमिका राहील. अशावेळी दोन्ही काॅग्रेसऐवजी स्वाभिमानीला जागा सुटल्यास काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी डाॅ. शिंगणेंनी पर्याय म्हणून विधानसभेच्या तबल्यावरही एक हात ठेवलेला आहे.

संबंधित लेख