clashes between dnyaneshwar patil and tanaji sawant in paranda | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील शिवसेनेत अस्वस्थ; तानाजी सावंतांशी जमेना!

सयाजी शेळके  
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

'मातोश्री'वर संबंध असल्याने आमदार प्रा. सावंत यांनी आखाड्यात पाटील यांना चितपट केले.

उस्मानाबाद : शिवसेना उपनेते तथा आमदार प्रा. तानाजी सावंत आणि परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष सुरूच आहे. सोमवारी (ता. २६) माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत उपनेत्यांना (संपर्कप्रमुखांना) स्थान मिळाले नसल्याने या सुप्त संघर्षाची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. 

माजी आमदार पाटील यांनी दोन वेळा (१९९५, १९९९) परंडा विधानसभा मतदरासंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर त्यांना दोन वेळा पराभव पत्करावा लागला. २००९ मध्ये उद्योजक शंकरराव बोरकर यांना उमेदवारी मिळाली. आर्थिक वर्चस्वाच्या जोरावर बोरकरांनी मोटेंना जोराची टक्कर दिली. पक्षातून दगाफटका झाल्याने बोरकरांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

आर्थिक आघाड्यावर कमी असल्याचे लक्षात येताच माजी आमदार पाटील यांनी साखर कारखानदार प्रा. तानाजी सावंत (नातलग) यांच्याशी जवळीक साधली. प्रा. सावंतांनी जिल्ह्यात हळूहळू साखर कारखानदारीचे जाळे पसरविले. परंडा, वाशी तालुक्यात दोन साखर कारखाना सुरू करीत जनसंपर्क वाढविला. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रा. सावंत परिवाराने उस्मानाबादचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासोबतही चांगले संबंध ठेवले. यातून प्रा. सावंत यांचे 'मातोश्री'वर संबंध प्रस्तापित केले. सर्व आघाड्यावर सक्षम असल्याचे लक्षात येताच प्रा. सावंत यांनी यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून आमदारकी मिळविली. शिवाय शिवजल क्रांतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वास संपादन करून उपनेतेपदही मिळविले. सहाजिकच दुसरीकडे माजी आमदार पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का पोहचत होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेतील तिकीटवाटपात दोघात कायम संघर्ष सुरू राहिला.

'मातोश्री'वर संबंध असल्याने आमदार प्रा. सावंत यांनी आखाड्यात पाटील यांना चितपट केले. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षात पाटील पक्षात फारच अस्वस्थ आहेत. त्यामुळे पाटील यांनी जुन्या शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांसोबत जवळीक साधत वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पाटील यांनी यापूर्वी राजकीय कौशल्याने जवळच्यांनाही हादरे दिले होते. असे अनेकजन उपनेते प्रा. सावंत यांच्या कळपात जावून सामिल झालेत. दोघातील संघर्ष अजूनही कायम आहे.

सोमवारी माजी आमदार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. अनेक वर्तनमान पत्रात वाढदिवसाच्या जाहिराती झळकल्या. उपनेते प्रा. सावंत यांच्याकडे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्‍याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आहे. प्रा. सावंतांना मात्र जाहिरातीत स्थान मिळाले नाही.
 

संबंधित लेख