चिंतामण वनगा : राजकारणातील एक साधा माणूस 

चिंतामण वनगा : राजकारणातील एक साधा माणूस 

रा. स्व. संघाने आणि भाजपने जे काही दिले त्यात खासदार चिंतामण वनगा यांनी नेहमीच समाधान मानले. तसेच तलासरीजवळील वनवासी कल्याण केंद्राशी तर त्यांचे हृदयाचे नाते. हे केंद्र त्यांनी हृदयाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर जपून ठेवले होते.

चिंतामण वनगा गेले. राजकारणातील एक साधासरळ माणूस. आजच्या राजकारण्यांकडे पाहिले तर वनगा हे त्यांच्यामध्ये कुठेच बसणारे नव्हते. राजकारणात इतकं साध असावं का ? असा प्रश्‍नही त्यांच्या चाहत्यांना पडत असे. खरेतर वनगा हे सत्ताधारी भाजपचे खासदार होते. सत्ताधारी असणे म्हणजे काय असते हे अनेक लोकप्रतिनिधी सांगू शकतात. वकील व्यवसायाकडून राजकारणाच्या फडात आलेल्या या माणसाने नेहमीच गोरगरीब, आदिवासींच्या विकासासाठी आवाज उठविला. 

हा आवाज उठविताना श्रेय लाटण्याचे उद्योगही त्यांनी केला नाही. वनगासाहेब म्हणजे आपल्या घरातील माणूस अशीच धारणा त्यांच्याविषयी होती. वनगा हे आदिवासी समाजातील. ते मूळचे डहाणू तालुक्‍यातील कोवाड गावचे. डहाणू तालुका हीच त्यांची कर्मभूमी. 

डहाणू हे गुजरातच्या सीमेवरील. याच तालुक्‍यात ताराबाई मोडक, अनुताई वाघांची कोसबाडची टेकडी आहे तशीच ओळख थोर समाजसेविका गोदाबाई परुळेकर यांच्यामुळेही हा तालुका ओळखला जातो. या तीन थोर महिलांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजासाठी खर्ची केले. तसेच रा. स्वं. संघाचा वनवासी कल्याण केंद्रही तलासरीजवळच. याच केंद्राने वनगांना घडविले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

या तालुक्‍यात एकेकाळी कम्युनिस्टांची मोठी ताकद होती. येथे आमदारही कम्युनिस्ट पक्षाचा निवडून येत असे. त्यामुळे कम्युनिस्ट विरुद्ध संघ किंवा भाजप असा संघर्षही अनेकवेळा येथे झाला. एकदा वनवासी कल्याण केंद्रावर हल्लाही झाला. तसेच काहीवेळा वनगानाही लक्ष्य करण्यात आले. त्यांच्यावरही हल्ला झाला. मात्र ते डगमगले नाहीत. आपले काम त्यांनी सुरूच ठेवले. संघाच्या संस्कारात घडलेले वनगा पक्षाचे जसे सक्रिय कार्यकर्ते होते. कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास त्यांना प्रवास राहिला. 

संघ आणि पक्षात काम करताना त्यांनी कधी वैयक्तिक महत्त्वकांक्षेला थारा दिला नाही. जर त्यांनी ठरविले असते आणि आदिवासी असल्याचे मार्केटिंग केले असते. मंत्री होणेही त्यांना अवघड नव्हते. पण, हे त्यांच्या स्वभावात नव्हते. ते केवळ स्वपक्षातच नव्हे तर सर्वच पक्षात प्रिय होते. शिवसेना-भाजपचे अनेकवेळा खटके उडाले. अगदी युती तुटण्यापर्यंत संबंध ताणले गेले. पण, वनगा हे युतीतील नेहमीच दुवा बनून राहिले. 

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील डहाणू लोकसभा मतदारसंघातून 1996 मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली. ते निवडूनही आले. त्यांचा मतदारसंघ म्हणजे अवाढव्य पसरलेला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते इकडे भिंवडीपर्यंत होता. बहुसंख्य आदिवासी मतदार असलेल्या या मतदारसंघात प्रचार करणे, निवडून येणे सोपे नव्हते. पण, वनगा निवडून आले पाहिजेत असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांना मनापासून वाटे. 

या दोन दिग्गज नेत्यांनीही वनगांसाठी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले होते. महाभारतातल्या श्रीकृष्णालाही (नीतिश भारद्वाज) महाजन यांनी विक्रमगडला आणले होते. बाळासाहेबांनी तर वनगा हे मतांचा कनगा भरतील आणि विरोधकांना लोळवतील असे सांगून जे भाषण केले होते तेही विसरता येत नाही. 

वनगा लोकांची कामे कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्नशील असंत. मात्र कोणालाही खोटे आश्‍वासन देणे त्यांना जमले नाही. त्यावेळचे उत्तर मुंबईचे खासदार होते राम नाईक (आता उत्तरप्रदेशचे राज्यपाल). नाईक यांचा मतदारसंघ जोगेश्‍वरी ते पालघरपर्यंत होता. रामभाऊ त्यावेळी माध्यमात नेहमीच चमकत असंत. त्यांचे नाव कुठे आले नाही असे होत नसे. वनगा मात्र या सर्व गोष्टीला अपवाद होते. ते राजकारणी असूनही प्रसिद्धीपासून काहीसे दूर असंत. 

एखाद्या पत्रकार किंवा वार्ताहराला बोलावून आपले मार्केटिंग केले आहे. बातमी छापून आणली आहे हे त्यांना कधीच जमले नाही. जमिनीवर पाय असलेल्या या नेत्यावर तरीही लोकांनी प्रेम केले.हा आपला माणूस आहे अशी भावना त्यांच्याविषयी होती. 

2014 च्या निवडणुकीत ते पालघरमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खासदार, आमदार पुन्हा खासदार अशी पदे भूषविलेला हा माणूस आपल्यापरीने संघासाठी आणि पक्षासाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिला. 

काहीवेळा त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा बातम्याही येत पण, त्या शेवटी अफवाच निघाल्या. मंत्रिपदच नव्हे तर कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी पक्षातील कोणत्याही नेत्यापुढे कधी हात पसरला नाही. संघाने आणि पक्षाने त्यांना जे काही दिले त्यात नेहमीच त्यांनी समाधान मानले. तलासरीजवळील वनवासी कल्याण केंद्राशी तर त्यांचे हृदयाचे नातं होते. हे केंद्र त्यांनी हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून आयुष्यभर जपून ठेवले होते. पेशाने वकील असलेल्या वनगांनी व्यवसाय समाजकारणाचा. 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंत नेते आहेत. सवरांना मंत्री म्हणून संधी मिळाली तशी संधी चिंतामण वनगांना मिळायला हवी होती. ही खंत त्यांच्या चाहत्यांना नेहमीच सतावत राहील. एक मनमिळाऊ, अजातशत्रू आणि राजकारणातील साध्या माणसाला सलाम ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com