chindam statement om nagar meyor surekha kadam | Sarkarnama

छिंदमच करणार महापौर सुरेखा कदमांवर कारवाई 

मुरलीधर कराळे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आज पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभेत महापारांना निवेदन दिले.

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आज पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभेत महापारांना निवेदन दिले. त्यामध्ये आपले नगरसेवकपद रद्द झालेले नसून, कायदेशिरदृष्ट्या हा ठराव चुकीचा आहे. त्या ठरावाला मंजूरी देऊ नये, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम निवेदनाद्वारे महापौर सुरेखा कदम यांना दिला आहे. त्यामुळे सभा तहकूब करण्यात येऊन ती उद्या (शुक्रवारी) घेण्यात येणार आहे. 

आज महापालिकेत विशेष सभा होती. त्यामध्ये छिंदम याने हजेरी लावत रजिस्टरवर सही केली. सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छिंदम आला व सही करून गेला. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी सभागृह घोषणांनी दणाणून सोडले. छिंदम आल्याच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्याची मागणी केली. गोंधळामुळे महापौर कदम यांनी सभेचे कामकाच शुक्रवारी दुपारी एक वाजता होईल, असे जाहीर करून सभा स्थगित केली. दरम्यान, छिंदमला महापालिकेत प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींकडून महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

महापौरांना दिलेल्या निवेदनात छिंदम याने म्हटले आहे की, माझा उपमहापौर पदाचा बनावट राजीनामा सादर केल्याप्रकरणी मी महापौर व त्यांचे पती संभाजी कदम, तत्कालिन आयुक्त घनश्‍याम मेंगाळे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. तसेच माझ्यावर लावलेले आरोप अद्यापपर्यंत सिद्ध झालेले नसून, मला कोणतीही शिक्षा झालेली नाही. ती ऑडिओ क्‍लिप बनावट असल्याने माझे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव चुकीचा आहे. त्यामुळे सदर ठरावाच्या इतिवृत्ताला मंजूरी देऊ नये. अन्यथा पदाचा व सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

संबंधित लेख