chindam open shivsena hidden agenda | Sarkarnama

छिंदमपुढे मतासाठी शिवसेनेचे लोटांगण; पुरती इज्जत गेली!

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

छिंदम याने आपल्याला मतदान करावे, असे बोराटे यांनी म्हटले आहे.

नगर : भर सभागृहात श्रीपाद छिंदमला चोपणाऱ्या शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवारानेच छिंदमपुढे मतदानासाठी हात पसरल्याचे समोर येत आहे. याबाबत छिंदमच्या संभाषणाची ऑडिओक्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

छिंदम हा अपक्ष म्हणून निवडून आला आहे. त्याने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांकडे अर्ज देवून मतदानासाठी संरक्षण मागविले होते. पोलिस संरक्षणात तो महापौर, उपमहापौर पदासाठी मतदान करण्यासाठी आला होता. त्याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांच्यासाठी हात वर करून मतदान केले. या वेळी शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी त्याला चोपले. या वेळी त्याने आपण काही लोकांच्या सांगण्यावरून मतदानासाठी आलो असून, शिवसेनेलाच मतदान करणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे व श्रीपाद छिंदम या दोघांचे संभाषण असल्याचे सांगितले जाते.  छिंदम याने आपल्याला मतदान करावे, असे बोराटे यांनी म्हटले असून, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या हालचालीबाबतही त्यांच्यात संभाषण झाले असल्याचे दिसून येत आहे.  

छिंदम याला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे छिंदमने माध्यमांसमोर बोलताना सांगितले. मला मतदानापासून रोखण्याचा कोणाचाही अधिकार नाही. असे असतानाही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी मला मतदान करण्यास विरोध केला. संबंधितांविरोधात आपण गुन्हे दाखल करणार असल्याचे त्याने सांगितले.  

संबंधित लेख