chief Minister should publish white paper on loan waiver -  Arunbhai Gujrathi | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी  कर्जमुक्तीची श्‍वेतपत्रिका काढावी - अरूणभाई गुजराथी

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 15 मे 2017

कर्जमुक्ती बाबत श्‍वेतपत्रिका काढावी, ती कशी करणार, किती लाखापर्यत करणार याची सविस्तर माहिती द्यावी. यामुळे शेतकऱ्यामंध्ये कर्जमुक्तीची खऱ्या अर्थाने हमी मिळेल.

जळगाव : वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत. त्यांच्या आशेवर आजही शेतकरी आहे. मात्र त्यांची वेळ कधी येईल हे माहित नाही. त्यांची वेळ येईल तेंव्हा येईल परंतु कर्जमुक्ती कशी करणार यांची श्‍वेतपत्रिका तरी शासनाने त्वरीत काढावे असे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री,  आणि माजी विधानसभा सभापती अरूणभाई गुजराथी यांनी जळगाव येथे बोलतांना केले. 

शेतकऱ्यांना कर्जसाठी रोख रक्कम उपलब्ध करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज जिल्हा बॅंकेला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना अरूणभाई गुजराथी म्हणाले,  उत्तर प्रदेशात भाजप शासनाने एक लाख रूपये कर्ज माफ केले, त्याच धर्तीवर राज्यशासनाने कर्जमाफीसाठी सर्वच बॅंकाकडून एक लाख रूपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागविली, मात्र त्यांच्याबाबत अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नाही.  आता शेतीचा हंगाम आला आहे. 

कर्जमुक्तीच्या आशेवर शेतकरी बॅंकाचा थकबाकीदार झाला आहे. त्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही.तर हंगामाला शेती तयार करण्यासाठी त्यांचे पैसा नाही, त्यामुळे शेतकरी आज हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शासनाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.  मात्र अगोदर त्यांनी कर्जमुक्ती बाबत श्‍वेतपत्रिका काढावी, ती कशी करणार, किती लाखापर्यत करणार याची सविस्तर माहिती द्यावी. यामुळे शेतकऱ्यामंध्ये कर्जमुक्तीची खऱ्या अर्थाने हमी मिळेल. यावेळी राष्टवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार अरूण पाटील, राजीव देशमुख, संजय पवार, विकास पवार, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख