Chhtarapati Shivaji Maharaj statue height reduced after Narendra Modi's tour : Prithviraj Chavan | Sarkarnama

पंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

चबुतरा आणि पुतळ्याची उंची कमी केली. खर्चाचा मुद्दा पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला. यासाठी लोकांना सरकारने आवाहन केले असते तर लोकवर्गणी मोठ्या प्रमाणात गोळा झाली असती.

- पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर  : " मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा बांधण्याच्या विषयात सरकारची भूमिका संशयाची आहे.कॉंगेस आघाडी सरकारच्या काळात हा प्रस्ताव झाला. मात्र सध्याच्या सरकारने त्यात बदल केला. पुतळ्याऐवजी स्मारक असा उल्लेख केला जाऊ लागला. पंतप्रधान मोदी येऊन गेल्यानंतरच्या काळात उंचीबाबत बदल झाले. हे सारे संशयास्पद आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात केली . 

आरक्षण प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवताना  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ,"निवडणुकीपूर्वी मराठ्यांना आरक्षण देऊ; तर धनगर समाजाला आठ दिवसांत आरक्षण देऊ, असे सांगणाऱ्या भाजपला सत्तेत येऊन चार वर्षे झाली आहेत. तरीही त्यांना आरक्षण देता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकार आरक्षणाबाबत प्रामाणिक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता जनतेची माफी मागावी."

सरकारने सर्वच पातळीवर भ्रमनिरास केला आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण पुढे  म्हणाले," पावसाळी अधिवेशन मोजके दिवस चालले. त्यात सरकारने ठोस काहीच सांगितले नाही. विरोधकांनी प्रश्‍न विचारले. त्यावर आलेली उत्तरे समाधानकारक नव्हती. उपप्रश्‍न करण्यासाठी वेळच दिला नाही. त्यामुळे अधिवेशनात फारसे काही हाती लागले नाही. शेतकरी आंदोलनापासून दूध आंदोलनाबाबत कोणताही समाधानकारक निर्णय सरकारने घेतलेला नाही. "

"शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात झाले आहे. सरकारच्या निराशाजनक कामगिरीतूनच मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. पण त्यातही काही ठोसपणा नाही. अशा स्थितीत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारला मदत करण्याची भूमिका कॉंग्रेसच्या बैठकीत घेतली आहे. सरकारला मदत करू, मात्र तरीही सरकारने काहीच केले नाही तर मुख्यमंत्र्यांना माफीच मागावी लागेल," असेही ते शेवटी म्हणाले . 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख