Chhagan Bhujbal Vs Tukaram Munde | Sarkarnama

छगन भुजबळ मुंडेंना म्हणाले ,'दादागिरी बंद करा'; मुंडे  उत्तरले 'नियमाप्रमाणेच काम करीन' 

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

महापालिका आयुक्त करवाढीवर ठाम राहिले. त्यामुळे भुजबळ यांनी सबंध शहर रस्त्यावर उतरवु ,असा इशारा देत तुर्त शस्त्र  म्यान केले. 

नाशिक :  करवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेविरोधात मोर्चा काढला. यावेळी प्रशासनातील हीमॅन तुकाराम मुंडे आणि राजकारणातील यंग अँग्री मॅन असलेले छगन भुजबळ काल एकमेकांविरोधात होते. मात्र त्यांनी एकमेकांना सामोरे जाण्याचे टाळले. यावेळी दोघांनीही आपल्या इमेज प्रमाणेच भूमिका घेतली.

छगन भुजबळ सभेपुढे गरजले, "तुकाराम मुंडे महापालिकेतील दादागिरी बंद करा. कामकाजात सुधारणा करा'' मुंडे यांनीही निवेदन देण्यासाठी आलेल्यांच्या नजरेला नजर भिडवत "करवाढ योग्यच आहे. कमी केली जाणार नाही '' असे सांगत मागणी धुडकावली. 

राष्ट्रवादी कॉंग्रसतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडवला. तेव्हा माजी उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधारी भाजपचा समाचार घेतला. "नागपुरचा होतोय विकास, दत्तक नाशिक होतेय भकास'' ही त्यांची टॅगलाईन होती. असा  विकास करायला मुंडे यांना नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्त केले आहे का? नाशिककरांवरील करवाढ रद्द करा. अन्यथा सबंध शहर रस्त्यावर उतरवु असा इशारा छगन भुजबळांनी  दिला. 

मात्र आयुक्त मुंडे यांनी निवेदनातील सर्वच मागण्या धुडकावत करयोग्य मूल्य दरवाढ योग्यच आहे. ती रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले. 

गेले सहा महिने सर्वच राजकीय पक्ष, नेते, शेतकरी अन्‌ संघटना करवाढीविरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र हाती काहीच पडले नाही. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच कार्यकर्त्यांनी जोर लावत शक्तीप्रदर्शन केले. नाशिककरांच्या पदरात काय पडते याची उत्सुकता होती. मात्र महापालिका आयुक्त करवाढीवर ठाम राहिले. त्यामुळे भुजबळ यांनी सबंध शहर रस्त्यावर उतरवु ,असा इशारा देत तुर्त शस्त्र  म्यान केले. 

संबंधित लेख