cheque holi in nagar | Sarkarnama

तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या निषेधार्थ धनादेशांची होळी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नुकसान भरपाईचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना येण्या-जाण्याचा खर्चही नुकसान भरपाईपेक्षा जास्त झाला असेल. लोकप्रतिनिधींनी व शासनाने ही मदत देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा फक्त देखावा केला. आम्ही हक्काची मदत मागतो; भीक नाही, हे शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया सूर्यकांत तुवर या शेतकऱ्याने व्यक्त केली. 

नगर : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मिळालेल्या तुटपुंज्या धनादेशाची होळी करण्याचा प्रकार नगर जिल्ह्यात घडला. नेवासे तालुक्‍यातील खेडले परमानंद येथील शेतकऱ्यांनी नेवासे तहसील कार्यालयासमोर त्यांना मिळालेल्या मदतीच्या रकमेच्या धनादेशाची होळी केली. धनादेश जाळून लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढले. अशा पद्धतीने नुकसान भरपाईच्या रकमेचे धनादेश जाळल्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी. 

मागील महिन्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळाथडी गावांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार उमेश पाटील यांनी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर लाखोंचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळाले अवघे तीन हजार 800 रुपयांच्या मदतीचे धनादेश. हे धनादेश पाहून शेतकरी संतापले. आणि थेट तहसील कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना जाब विचारत खेडले परमानंद व परिसरातील शेतकरी सूर्यकांत तुवर, माधव होन, पुंजाहरी तुवर, राधाकिसन तुवर, दौलत तुवर आदींनी त्या धनादेशांची होळी केली. 

तर देखावा कशासाठी 

संबंधित लेख