cheery blair | Sarkarnama

चेरी ब्लेअर सातारच्या महिलांना म्हणाल्या, "हाऊ वंडरफुल'! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017

चेरी ब्लेअर यांनी दुधेबावी (ता. फलटण) येथील धनश्री प्रकाश गिरीगोसावी कुटुंबीयांच्या गायींच्या गोठ्याला भेट देऊन त्यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. शेवई यंत्रामध्ये हात गेल्याने अपंगत्व आलेल्या सौ. गिरी यांना माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली. दोन गायींवरुन त्यांनी 10 गाई घेतल्या. 10 लिटर दुधावरून दररोज 100 लिटर दूध उत्पादन होऊ लागल्याने कुटुंबाला आर्थिक आधार मिळाल्याचे सौ. गिरी यांनी सांगितले

लोणंद (जि. सातारा)  : ग्रामीण भागातील महिला उद्योजकांनी उभारलेले यशस्वी छोटे छोटे उद्योग पाहून "हाऊ वंडरफुल', "व्हेरी नाईस' अशा शब्दांत चेरी ब्लेअर यांनी लोणंद आणि फलटण तालुक्‍यातील महिला उद्योजिकांचे कौतुक केले. माणदेशी फाउंडेशन व "चेरी ब्लेअर' फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे सहृदय व्यावसायिक नाते असून ते या पुढेही कायम राहील, असा विश्‍वासही चेरी ब्लेअर त्यांनी व्यक्त केला. 

माणदेशी फाउंडेशन व चेरी ब्लेअर फाउंडेशन फॉर वुमेन यांच्या भागीदारीत गेल्या दोन वर्षांत 530 हून अधिक महिला उद्योजकांना प्रशिक्षण व व्यवसाय साह्य देण्यात आले आहे. त्यांची प्रगती व वाटचालीचा आढावा घेण्यासाठी तसेच या नवउद्योजक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी व चेरी ब्लेअर फाउंडेशन फॉर वुमेनच्या संस्थापक अध्यक्षा चेरी ब्लेअर यांनी नुकतीच लोणंद, दुधेबावी येथील महिलांच्या उद्योगांना भेट देऊन पहाणी केली. 

चेरी ब्लेअर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना अर्थपुरवठा करण्यासाठी बॅंकांनी पुढे आले पाहिजे. जागतिक बॅंकेनेही पुढाकार घेऊन महिला उद्योजकांना अर्थपुरवठा करण्याबरोबर त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. 

यावेळी चेरी ब्लेअर यांनी माणदेशी महिला बॅंक व माणदेशी फाउंडेशनला भेट देवून पाहणी केली. यावेळी "माणदेशी'च्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा, अविनाश गोयल, लिओनार्डो, चेरी ब्लेअर फाउंडेशनचे संचालक, "माणदेशी'च्या सीईओ वनिता शिंदे, माणदेशी फाउंडेशनच्या लोणंद शाखाप्रमुख राजश्री रासकर, माणदेशी महिला बॅंकेच्या लोणंद शाखाप्रमुख अर्चना शिंदे, विशाल क्षीरसागर उपस्थित होते. 

चेरी ब्लेअर यांनी महिलांच्या विविध उत्पादनांची पाहणी केली. ज्या महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ होऊन त्या आपल्या व्यवसायात स्थिरावल्या आहेत, अशा महिलांचे अनुभव, जीवनगाथा त्यांनी जाणून घेतली. त्यावेळी चेरी ब्लेअर या स्वतः त्या महिलांजवळ जाऊन त्यांना आलिंगन देत होत्या. यावेळी पंढरपूर येथील गोपाळपुरातील भारुड सम्राज्ञी श्रीमती चंदाताई तिवाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेशभूषेसह सदर केलेल्या संगीत भारुडालाही त्यांनी टाळ्यांनी दाद दिली. यावेळी दहा शालेय विद्यार्थिनींना ब्लेअर यांच्या हस्ते सायकलींचे वाटप झाले. 

फोटो फीचर

संबंधित लेख