फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या नावाने एका लबाडाचा ग्रामपंचायतींना लाखोंचा गंडा
शिक्रापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नगर रोडवरील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला. अनिरुद्ध टेमकर पाटील असे त्याचे नाव आहे.
शिक्रापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नगर रोडवरील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला. अनिरुद्ध टेमकर पाटील असे त्याचे नाव आहे.
गावच्या विकासासाठी पैसे मिळावेत यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य तसेच अधिकारी राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांकडे पाठपुरावा करीत असतात. हीच मानसिकता ओळखून चार महिन्यांपूर्वी नगर महामार्गावरील मोठ्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व अधिकारी यांना समक्ष भेटून गावातील विकासकामांची माहिती घ्यायला टेमकर फिरत होता. गावातील अत्यंत निकडीचा प्रश्न यासाठी निधी मिळवून देतो, असे सांगत त्याने कोकणातील काही गावांची उदाहरणे दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतचे फोटोही दाखवून तो संबंधितांचा विश्वास संपादन करीत असे. बोलणी अंतिम टप्प्यात आल्यावर मध्यस्थांना पैसे द्यावे लागतात म्हणून रोख पैसे मागत असे. काही सरपंचांनी रोख स्वरूपात लाखो रुपये दिले. काहींनी ऑनलाइन पैसे भरले. मात्र, टेमकरची पैशांची मागणी वाढू लागल्याने काही सरपंचांना त्याच्याबद्दल शंका आली. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर टेमकरने मोबाईल बंद केला आहे.
इंडियन ऑइल अध्यक्षांचे नावे पत्र
शाळांच्या भव्य इमारती, कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाणी फिल्टर योजना अशांसाठी इंडियन ऑइल कंपनी कोट्यवधी रुपये देते असे सांगून कंपनीचे अध्यक्ष भगत यांच्या नावाने अनिरुद्ध टेमकर पत्र लिहून घेत असे. या पत्राची प्रत सकाळकडे उपलब्ध झाली आहे.
मुंडे यांचा कार्यकर्ता नाही
कोरेगाव भीमाचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले की, त्याच्याशी बोलतानाच तो लबाड असल्याचे समजले होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाला त्याच्याबाबत कळविले आहे. तो त्यांचा कार्यकर्ता नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कायदेशीर कार्यवाही करणे सयुक्तिक ठरणार आहे.