चव्हाणांना २०१९ खुणवतंय! शेट्टीही म्हणतात पृथ्वीराज हे `माजी` राहणार नाहीत!

चव्हाणांना २०१९  खुणवतंय! शेट्टीही म्हणतात पृथ्वीराज हे `माजी` राहणार नाहीत!

सोमेश्वरनगर : मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर लोक आम्हाला 'आता वीस वर्षे सत्ता विसरा' असं म्हणायचे. आम्हालाही खरं वाटायचं. पण मोदी सरकार अपयशी ठरले असून 2019 मध्ये निश्चित आम्ही आहोत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या दाव्याला खासदार राजू शेट्टी यांनी दुजोरा देत चव्हाण हे फार काळ `माजी` राहणार नसल्याची खात्री व्यक्त केली.

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कै. बाबालाल काकडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पृथ्वीराज चव्हाण, खासदार राजू शेट्टी व माजी सहकारमंत्री हर्षवधर्न पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार संभाजीराव काकडे होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराव मोरे, शामकाका काकडे, शिवाजीराव भोसले, 'माळेगाव'चे अध्यक्ष रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश खोमणे, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

चव्हाण यांनी या कार्यक्रमात मोदी यांच्यावर टीका केली. `मला सगळं कळतं नि सगळं मी करणार, हा अहंकार चांगला नाही. मागील वर्षी कृषी उत्पन्नात 8.3 टक्के घट असताना 2022 मध्ये कृषीउत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फसवी आहे. जगात पहिल्या दोनशेत देशातील एकही विद्यापीठ नाही. 'एचआरडी' मंत्रालय पन्नास कोटीत विश्वविद्यालय उभारायची घोषणा करते. पण पन्नास कोटीत जागतीक दर्जाचे विद्यापीठ होत नाही हे मंत्रिमहोदयांना माहित नाही का?' असा सवाल त्यांनी केला.

34 हजार कोटीची कर्जमाफी देणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी 12-13 हजार कोटीच दिले आहेत. विधीमंडळात, संकेतस्थळावर त्याची माहिती देत नाहीत. बँकेत कर्ज घेताना कितीतरी अंगठे उठवलेले असताना त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज कशाला मागविले? कर्नाटक-गुजराथमध्ये शेतकऱ्याला अनुदान देतात, शाळांत दूधभुकटी देतात मग इथे का करत नाही, असेही सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले.

खासदार राजू शेट्टी यांनीही चव्हाण यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.  शेतकरी व कारखानदार एकत्र आले तर आताच्या सरकारची थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

हर्षवर्धन पाटील यांनी राजूभैय्या आता आमच्यासोबत आहेत असे उद्गार काढले तर पृथ्वीराज चव्हाणही `राजूभैय्या`, `राजूभैय्या`, असा सतत उल्लेख करत होते. यावर राजू शेट्टी यांना, काँग्रेससोबत आघाडी निश्चित झाली काय, असा विचारला असता त्यावर शेट्टी यांनी मोठ्याने हसत, अजून आघाडीचा निर्णय निश्चित झालेला नाही. आता यावेळी आम्ही फसणार नाही. यावेळी सगळं बंदीस्त करून घेणार मग अंतिम निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com