Charutalta Tokas Criticizes Subhash Bhamre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

संरक्षण मंत्री असंवेदनशील - काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांचा आरोप 

प्रवीण धोपटे 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आयुध निर्माण कारखान्यात तयार केला जाणारा दारुगोळा साठविला जातो. तेथून हा दारुगोळा देशातील विविध लष्करी तळावर पाठविला जातो. दोन वर्षांपूर्वी या डेपोमध्ये स्फोट होऊन 15 जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तात्काळ भेट दिली होती.

वर्धा : 'वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगेच भेट दिली होती. मंगळवारी पुन्हा पुलगाव येथे भीषण स्फोट झाल्यानंतरही संरक्षण मंत्री किंवा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही. हा असंवेदनशीलपणा आहे,' असा आरोप महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केला.
 
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आयुध निर्माण कारखान्यात तयार केला जाणारा दारुगोळा साठविला जातो. तेथून हा दारुगोळा देशातील विविध लष्करी तळावर पाठविला जातो. दोन वर्षांपूर्वी या डेपोमध्ये स्फोट होऊन 15 जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तात्काळ भेट दिली होती. तसेच तत्कालिन लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनीही भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती तसेच जखमींची विचारपूस केली होती. 

मंगळवारी स्फोट झाल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी घटनास्थळाला भेट दिली नाही. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आहेत. ते महाराष्ट्रातील असूनही पुलगावला आले नाहीत. लष्कराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुलगावला भेट दिली नाही. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने एक प्रसिद्धी काढून घटनेची माहिती दिली. 

या संदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना चारूलता टोकस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. चारुलता टोकस या वर्धा येथील असून त्यांनी बॉम्ब स्फोटानंतर जखमींची विचारपूस केली तसेच मृत पावलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. टोकस म्हणाल्या, ''ही अत्यंत भीषण घटना आहे. या घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले. तरीही संरक्षण मंत्र्यांना पुलगावला यायला वेळ मिळाला नाही. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तर महाराष्ट्रातील आहे. परंतु त्यांना धुळे महापालिकेच्या निवडणुकीत अधिक लक्ष द्यावे वाटते परंतु त्यांच्या खात्यातील एका प्रकल्पामध्ये एवढा भीषण स्फोट होऊनही त्यांनी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही." हा संपूर्ण प्रकार असंवेदनशील असल्याचा आरोप टोकस यांनी केला. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी टोकस यांनी केली.

संबंधित लेख