charulata tokas vardha | Sarkarnama

चारुलता टोकस वर्ध्यातील कॉंग्रेसला संजीवनी देतील?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर : वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून चारुलता टोकस यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. वर्धा जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु 90 च्या दशकापासून या बालेकिल्ल्याला खिंडार पडायला सुरूवात झाली. 

नागपूर : वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून चारुलता टोकस यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. वर्धा जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु 90 च्या दशकापासून या बालेकिल्ल्याला खिंडार पडायला सुरूवात झाली. 

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी पहिल्यांदा या जिल्ह्यातून कॉंग्रेसला धक्के दिले. आता शेतकरी संघटनेचा प्रभाव नसला तरी भाजपने ही जागा घेतली आहे. गटबाजीमुळे कॉंग्रेसचे संघटन मजबूत राहिले नाही. सध्या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील प्रचार सभांची सुरूवात वर्धेतून केली होती. या सभेने रामदास तडस यांच्या उमेदवारीला पाठबळ मिळाले. 

कॉंग्रेस अद्यापही गटबाजीत मश्‍गुल असल्याने भाजपला तसे कोणतेही आव्हान नाही. वर्धा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश केल्याने कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी वर्धा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या चारुलता टोकस यांनी वर्धा जिल्ह्यात जनसंपर्क मोहिम सुरू केली आहे. 

प्रभा राव यांना मानणारा मोठा वर्ग वर्धा जिल्ह्यात असून या पुण्याईवर चारुलता टोकस वर्धा मतदारसंघात लढाई जिंकण्याची आस धरून आहेत. कॉंग्रेसकडे चारुलता टोकसशिवाय दुसरा उमेदवारही नाही. भाजपचे खासदार रामदास तडस यांना गेल्या चार वर्षात कोणताही प्रभाव टाकता आलेला नाही. ही बाजू चारुलता टोकस यांच्या पथ्यावर पडू शकते. 

गांधी जिल्ह्यात कॉंग्रेस येईल- चारुलता टोकस 
सेवाग्राममुळे वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हटले जाते. या जिल्ह्यात कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसचा कार्यकर्ता एकजुटीने कामाला लागला आहे. भाजपच्या खासदाराने कोणतेही विकास कामे न केल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे चारुलता टोकस यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. येथे कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा दावाही त्यांनी केला. 
 

संबंधित लेख