Chappals Thrown in Gokul General Body at Kolhapur | Sarkarnama

गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच चपलांचा पाऊस 

सदानंद पाटील 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

गोकूळ सर्वसाधारण सभेत संघ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय अडीच महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गोकुळची सभा गाजण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सत्ताधारी गटाने ठरावधारकांना व्यासपीठाच्या बाजुला आणून बसवले होते.

कोल्हापूर : राज्य, देशासह आशिया खंडात अग्रेसर असलेल्या गोकुळच्या 56 व्या सभेत चपलांचा पाउस पडला. मल्टीस्टेटवरुन सत्ताधारी-विरोधक भिडले. नंतर शाब्दिक चकमक होवून दोन्हीकडून जोरदार चप्पलफेक झाली. छायाचित्रण करणाऱ्या वृत्त वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासह दोन्ही बाजुच्या नेत्यांकडे ही चप्पलफेक झाली त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. तसेच नाश्‍त्याच्या पिशव्यांसह दूध आणि लस्सीच्या पिशव्यांचीही फेकाफेकी झाली. 

अडीच महिन्यापूर्वी गोकूळ सर्वसाधारण सभेत संघ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गोकुळची सभा गाजण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सत्ताधारी गटाने ठरावधारकांना व्यासपीठाच्या बाजुला आणून बसवले होते. दरम्यान विरोधक दहा वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या मुख्य प्रवेशदवारावर आले. मोठ्या प्रमाणात विरोधकही आल्याने त्यांना सभागृहाबाहेर अडविण्यात आले. त्यामुळे पोलीस व नेत्यांची बाचाबाची झाली. 10 वाजून 50 मिनिटांनी विरोधी गटाचे ठराव धारक सभागृहात आले. 

सभागृहात बसण्यासाठी मागे जागा असल्याने आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील थेट सभागृहाच्या दिशेने घुसले. सत्ताधारी ठराव धारकांच्या मधून ते वाट काढत येत असतानाच सत्ताधारी गटाने त्यांना विरोध केला. मात्र, हा विरोध झुगारत आमदार मुश्रीफ व आमदार नरके व्यासपीठाकडे धावले. त्यातच ठराव वाचन सुरु झाले आणि समर्थन-विरोधात घोषणा सुरु झाल्या. या घोषणाबाजीत चपला भिरकावण्यास सुरुवात झाली. कधी व्यासपीठाच्या बाजूने तर कधी व्यासपीठाकडे चपलांचा पाऊस पडला. त्यामुळे चांगलीच धावपळ उडाली. 

संबंधित लेख