पुण्यात महापौर बदलाचे वारे;  इच्छुकांचे पतंग पुन्हा हवेत!

पुण्यात महापौर बदलाचे वारे;  इच्छुकांचे पतंग पुन्हा हवेत!

पुणे : मुक्ता टिळक यांचे महापौरपद आणखी सव्वा वर्षे टिकणार की नाही, हा सध्या पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाणारा प्रश्न आहे. भाजप सत्तेवर असलेल्या सर्वच महापालिकांत सव्वा वर्षांच्या महापौरपदासाठी आता धोरणात्मक निर्णय पक्ष घेणार आहे. या हालचाली सुरू झाल्यामुळे पालिकेत खरेच नवीन महापौर येणार का आणि नवीन महापौर कोण असेल याचे आडाखे मांडण्यात येऊ लागले आहेत. 

महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असला तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने महापालिकेच्या कार्यकाळात प्रत्येकी सव्वा वर्षाचा कालखंड महापौर पदासाठी निश्चित केला होता. त्यामुळे पाच वर्षांत चार जणांना संधी मिळाली होती. टिळक यांच्या महापौरपदाला 15 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे महापौरपदाच्या बदलाची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यात जातीय समीकरणांचा संदर्भ दिला जात आहे.

या सर्व आडाख्यांनुसार काही नावे राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहेत. त्यात वर्षा तापकीर, रेश्मा भोसले, राणी भोसले या नावांचा समावेश आहे. अर्थात इतरही नावे अनपेक्षितरित्या पुढे येऊ शकतात. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या वर्षा या भावजय आहेत. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे तांत्रिकदृष्ट्या आमदार असलेले अनिल भोसले यांच्या रेश्मा या पत्नी आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांचे नाव चर्चेत होते. 
 
महापौर बदलले गेले तर, पुढच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. त्याचाही विचार केला जात आहे. टिळक मधल्या काळात आजारी होत्या. मात्र सध्या "महापौर आपल्या दारी' या कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे. भाजपमध्ये 98 नगरसेवक आहेत. सध्याचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव आहे. त्यामुळे बदल झाल्यास नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. खुल्या गटातील इच्छूक महिला नगरसेविकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली असून त्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. 

धोरणात्मक निर्णय होणार ! 

याबाबत भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ""महापौरबदलाचा प्रश्‍न केवळ पुण्याचा नाही; तर राज्यातील 11 महापालिकांमध्ये आहे. त्याबाबतचा निर्णय प्रदेश स्तरावर होणार आहे. त्यासाठीची बैठक जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com