chandrkant patil shows arrogance of power : Shetty | Sarkarnama

चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आला आहे : राजू शेट्टी

उमेश घोंगडे
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची जीभ अलिकडच्या काळात वारंवार घसरू लागली आहे. एकप्रकारे त्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. "सरकारनामा फेसबुक लाईव्ह'मध्ये बोलत होते.

पुणे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची जीभ अलिकडच्या काळात वारंवार घसरू लागली आहे. एकप्रकारे त्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. "सरकारनामा फेसबुक लाईव्ह'मध्ये बोलत होते.

आपण मुख्यमंत्री आहोत अशा थाटात सर्वच विषयावर सध्या पाटील मत व्यक्त करीत असतात. मात्र त्यांची आकलनक्षमता कमी आहे. त्यामुळे त्यांना प्रश्नच समजत नाहीत. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे मराठा आंदोलन चिघळले आहे. ते मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरत असतात, अशी टीका त्यांनी केली. कोल्हापूरचा माणूस मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला आवडणार नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले ते मुख्यमंत्री झाले तर एक कोल्हापूरकर म्हणून आनंद झाला असता, हे मी या आधी बोललेलो होतो.

मराठा आरक्षणापासून दूध आंदोलनापर्यंत सर्वच विषयावर राज्य सरकार व मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना करीत नाहीत. मुळात अशाप्रकारच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची सुरवातीपासून भूमिका राहिली आहे. मात्र अंगलट येऊ लागल्यानंतर त्यांना जागा येते, अशी टीका शेट्टी यांनी केली.  मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वानीच दिले. मात्र दिलेल्या आश्वासनांवर ठाम न राहता लोकांची फसवणूक केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याचा अनुभव सध्या मुख्यमंत्री घेत आहेत. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे सर्वाधिक दुर्लक्ष झाले आहे. 

राजकीय लाभापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्‍न आमच्यासाठी महत्वाचे असून शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची तयारी असेल तरच आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सोबत जाण्याचा विचार करू, असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. लोकसभेसाठी हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, बुलढाणा, धुळे या मतदारसंघासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. लोकसभेत दोन खासगी विधेयके मांडण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधिकार देणारा कायदा तसेच दुधासह, पालेभाज्या व शेती सर्व उत्पादनांना हमी देण्याचा कायदा ही दोन विधेयके आहेत. ही दोन्ही विधेयके या आठवड्यात लोकसभेत मांडणार असून यासाठी दोन्ही कॉंग्रेससह देशातील 22 राजकीय पक्षांनी लेखी पाठिंबा दिला असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख