Chandrkant Patil Adopts Titegha village | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

चंद्रकांतदादा पाटलांचा टिटेघरवर जडला जीव! 

विजय जाधव
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

संवेदनशीलतेने काम केले की एखादा मंत्रीही वेगळा ठसा उमटवू शकतो. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तेच केले. स्वखर्चातून टिटेघर हे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आता आमची जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

भोर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे जिल्ह्यातील टिटेघर (ता. भोर) या गावावर जीव जडला आहे. हे गाव दादांनी दत्तक घेतले असून, या गावात येणाऱ्या विविध विकासकामांसाठीचा खर्च ते स्वतःच्या खिशातून करणार आहेत. दादांनी हे गाव दत्तक घेतले असून, एक वेगळा आदर्श इतर नेत्यांसमोर उभा केला आहे. 

भोरपासून जवळ असलेल्या रायरेश्‍वराच्या पायथ्यानजिक 1650 लोकवस्तीचे हे गाव आहे. गेल्या 35 वर्षांपासून येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. याशिवाय इतर निवडणुकीमध्ये सर्व ग्रामस्थ फक्त निवडणुकीपुरतेच पक्षाचा विचार करीत करतात. नंतर सर्व विकासकामे ही एकत्र येऊन करतात. येथील ध्रुव प्रतिष्ठानचे राजीव केळकर हे कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वखुशीने विकासकामे करण्यासाठी पुढाकार घेऊन सर्व उपक्रमांचे नियोजन करीत असतात. त्यांना सर्व ग्रामस्थांची साथ मिळते. 

चंद्रकांतदादांच्या कानावर या गावाची माहिती योगायोगानेच गेली. त्यांचा दोन जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला. "आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी फुलांच्या व हारांच्या बदल्यात तेवढ्यात किमतीचे खत द्यावे. ते खत राज्यातील गरीब शेतकऱ्यांना मोफत देणार आहे,'' असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या विनंतीला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या चाहत्यांनी 25 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 किलो खत मिळेल, अशी व्यवस्था केली.

दादांनी तेवढेच खत स्वतःच्या पैशाने विकत घेऊन विविध गावांतील शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. टिटेघरमधील 364 शेतकऱ्यांना या उपक्रमातून खत मिळाले. येथील ग्रामस्थांचे एकमेकांपोटी असलेल्या सहकार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली. त्यासाठी तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील यांनी पुढाकार घेतला. गावाला कोणत्या बाबींची गरज आहे, याचीही माहिती मंत्र्यांनी घेतली. ते समजल्यानंतर त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी गणवेश पाठवून दिले. 

या गावाला स्वतः भेट द्यायचे त्यांनी ठरवले आणि ते आज (16 ऑगस्ट) गावात दाखल झाले. या वेळी त्यांनी गावातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या वेळी बोलताना त्यांनी गावाच्या विकासासाठीचा "रोड मॅप'चा सांगितला. पुढील तीन वर्षात टिटेघर येथील एकही माणूस असमाधानी राहणार नाही यासाठी गावात नियोजनबध्द कार्यक्रम राबविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासाठी स्वखर्चातून विविध विकासकामे करून टिटेघर गाव मॉडेल करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. 

टिटेघरला जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी ते स्वतः खर्च करणार आहेत. त्यासाठी गावाने श्रमदान करावे अशी इच्छा त्यांनी गावकऱ्यांकडे व्यक्त केली. गावातील महिलांच्या हिमग्लोबीनची तपासणी करून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार तीन महिने अशा महिलांना मोफत आहार देण्यात येणार आहे. पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व उत्पादित केलेल्या पिकांना चांगला बाजारभाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार. गरीब शेतकयांच्या मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.

 
महिलांना उद्योगासाठी आर्थिक सहकार्य करणार. उद्योग सुस्थितीत झाल्यानंतर हे पैसे पर घेणार आणि इतर महिलांना त्याचे वाटप करणार. यापुढे तालुक्‍यातील महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांच्या शासकीय अधिका-याची बैठक घेवून विकासकामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

जमिनीत पाणी साठविण्यासाठी नवीन टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. जमिनीखालील पाण्याचा शोध घेऊन त्यात कित्येक लाख लिटर पाणी साठविण्यासाठी सध्या आधुनिक सेन्सॉर तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या साह्याने टिटेघर गावाचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. गावात एक बंधारा बांधण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढ्याच खर्चात या नवीन तंत्रज्ञानाव्दारे जमिनीखाली पाणी साठविता येणे व ते वापरणे शक्‍य असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रकांतदादांच्या या सहकार्यामुळे आमची जबाबदारी उलट वाढली आहे. त्यांनी दिलेली मदतीचा योग्य विनियोग करून गाव प्रगतिपथावर ठेवण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नसल्याचे केळकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख