Chandrashekhar Bawankule gives order to check property of Mahavitran officers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

महावितरणच्या अधिकाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तपासा : बावनकुळे 

श्रीकांत पाचकवडे 
शुक्रवार, 19 मे 2017

वीजजोडणी, जास्त देयके लावणे, तक्रारींचा निपटारा मुदतीत न करण्याच्या शेकडो तक्रारी येत आहेत. तुम्ही जनतेचे नोकर आहात. त्यांचे काम मुदतीत करत नसला तर पगार कशाचा घेता ? 
- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री 

अकोला : शासकीय कामासाठी जनतेची आर्थिक पिळवणूक करून गब्बर बनलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी भागीदारी असल्याने अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करीत विदर्भातील महावितरणच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तपासा असा धडाकेबाज आदेश दिल्याने बावनकुळेंचा रुद्रावतार पाहून अकोल्यात आयोजित जनता दरबारात अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. 

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा,आमदार रणधीर सावरकर,आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळिराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

जनतेच्या कामात दफ्तरदिरंगाई न करता तातडीने उपाययोजना करून प्रकरणांचा निपटारा करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, महावितरणचे काही अधिकारी, कर्मचारी आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीने जनतेच्या कामांना विलंब लावत असल्याचे वास्तव आहे. वीजजोडणी, जास्त देयके लावणे, तक्रारींचा निपटारा मुदतीत न करण्याच्या शेकडो तक्रारी येत आहेत. तुम्ही जनतेचे नोकर आहात. त्यांचे काम मुदतीत करत नसाल तर पगार कशाचा घेता, अशा कडक भाषेत खडसावत ऊर्जामंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे असून ही गुत्तेदारी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा ऊर्जामंत्र्यांनी या वेळी दिला. विदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तपासा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी दिले. 

ग्राहक आले मीटर घेऊन 
महावितरणने बीपीएल ग्राहकांना मीटर दिले. मात्र, ते महिनोगणती लावून दिले नसल्याने उंदरांनी कुरतडून टाकल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात आज एका ग्राहकाने चक्क मीटर आणून दाखविला. त्यावर त्या शाखा अभियंत्याला हे मीटर भेट देण्याचे सांगत ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 

संबंधित लेख