चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान 21 एप्रिलला मतमोजणी

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे - जे. एस. सहारिया
चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान   21 एप्रिलला मतमोजणी

मुंबई - चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार 19 एप्रिलला मतदान होणार असून शुक्रवारी 21 एप्रिल मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.

सहारिया यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच 'वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल'चा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्याचे सहारिया यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक काल (ता.21) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. या यंत्रांची व निधीची उपलब्धता इत्यादींबाबत सर्वंकष विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता लगेच चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा वापर करणे शक्य होणार नसल्याचे सहरिया यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल 2017, लातूर महानगरपालिकेची 20 मे 2017; परभणी महानगरपालिकेची 15 मे 2017 रोजी मुदत संपत आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी (ता. 2 एप्रिल) स्वीकारण्यात येतील. 28 मार्च 2017 रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी (ता. 2 एप्रिल) ती स्वीकारण्यात येतील.

निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 27 मार्च ते 3 एप्रिल 2017

·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 5 एप्रिल 2017

·         उमेदवारी मागे घेणे- 7 एप्रिल 2017

·         निवडणूक चिन्ह वाटप- 8 एप्रिल 2017

·         उमेदवारांची अंतिम यादी- 8 एप्रिल 2017

·         मतदान- 19 एप्रिल 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)

·         मतमोजणी- 21 एप्रिल 2017


धुळे, सांगलीला पोटनिवडणूक
सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होईल. 21 एप्रिल 20174 रोजी मतमोजणी आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत सादर करता येतील.  

जि.प. व पं. स. पोट निवडणूक

धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी 30 मार्च ते 5 एप्रिल 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com