Chandrapur city congress welcomes statement of RSS chief Mohan Bhagwat | Sarkarnama

चंद्रपूर शहर कॉंग्रेसने मानले सरसंघचालकांचे आभार

प्रमोद काकडे :  सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

डॉ. मोहन भागवत यांचे मूळ गाव चंद्रपूर आहे. त्यांचे बालपण व 12 वीपर्यंतचे शिक्षणही चंद्रपूरमध्ये झाले आहे.

नागपूर :  चंद्रपूर येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फलक लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आभार मानले आहे. चंद्रपूर शहर कॉंग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीची शहरात चर्चा सुरू आहे.

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात बोलताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कॉंग्रेसची मुक्तकंठाने स्तुती केली होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेसचे योगदान मोठे असून कॉंग्रेसने देशासाठी मोठे महापुरुष दिल्याचा कृतज्ञतापूर्व उल्लेख भागवत यांनी भाषणात केला होता.

चंद्रपूर शहर कॉंग्रेसने  डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहे. 'हर हर कॉंग्रेस, घर घर कॉंग्रेस' असे लिहून या फलकावर ' स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसचे योगदान मोठे आहे', डॉ. मोहन भागवत असे या फलकावर लिहिले आहे. डॉ. मोहन भागवत यांचे मूळ गाव चंद्रपूर आहे. त्यांचे बालपण व 12 वीपर्यंतचे शिक्षणही चंद्रपूरमध्ये झाले आहे. त्यांच्या जन्मगावात कॉंग्रेसची प्रशंसा केल्याबद्दल रा. स्व.संघाचे सरसंघचालकांचे फलक लागल्याने चर्चा सुरू झाली आहे.

 हा फलक राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घराजवळ लावण्यात आले आहे. या फलकाबद्दल बोलताना चंद्रपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष नंदू नगरकर म्हणाले," पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस मुक्त भारत करण्याची भाषा केली आहे. याउलट भाजपवर नियंत्रण असलेल्या रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांनी कॉंग्रेसची मुक्तकंठाने स्तुती केल्याने हे फलक लावण्यात आले आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत . " 

रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आभार मानणारे कॉंग्रेसने लावलेला फलक.  

संबंधित लेख