chandraknatdada patil on swaminathan | Sarkarnama

चंद्रकांतदादा म्हणतात, स्वामीनाथन हे दाक्षिणात्य अभिनेते! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जून 2017

भाजपचे मंत्री, पदाधिकारी मंत्री शेतकऱ्यांसंदर्भात सातत्याने वादग्रस्त वक्‍तव्य करित आहेत. त्यात आता सौम्य बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रकांतदादांची भर पडली आहे. 

कोल्हापूर : राज्याचा शेतकरी संपाचा वणावा पेटला असताना, स्वामिनाथन अहवाल लागू करण्याची मागणी जोरावर असताना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांनी हा विषय हसण्यावारी नेत किरकोळीत काढला आहे. त्यांच्यामते स्वामिनाथन हे दाक्षिणात्य अभिनेते आहेत ! 

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती घडविण्याचे मार्ग सूचविणारा स्वामिनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. हा मुद्दा मान्य केल्याने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएमध्ये सामील झाली होती. त्यानंतर सातत्याने शेट्टी यांनी ही मागणी लावून धरली आहे. इतर पक्षही ही मागणी नेटाने करीत आहेत. शेट्टी यांनी तर शेतकऱ्यांना दिलेले वचन एनडीएने न पाळल्याने आत्मक्‍लेश आंदोलन केले. पुणतांब्यातील शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे. यासंदर्भाने महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. यापार्श्‍वभूमीवर स्वामीनाथन कोण हे आपणाला माहित नसल्याचे महसूलमंत्री पाटील यांचे विधान समोर आले आहे. 

चंद्रकांतदादा यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. सरकारचा कर्जमाफीचा निर्णय आणि संप माघारीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याबाबतचा प्रश्‍न विचारल्यावर चंद्रकांतदादांनी हा विषय हसतच पुढे नेला. स्वामीनाथन जे नाव आहे ते ऐकून मला हा दाक्षिणात्य अभिनेता आहे की काय, असे वाटल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

संबंधित लेख