chandrakantdada on sharad pawar | Sarkarnama

"शेतकऱ्यांचा राजा' ही पदवी जाण्याची पवारांना भीती ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जून 2017

राजकीय दुकाने बंद होण्याच्या भितीपोटीच शेतकऱ्यांचा संप अधिक चिघळत कसा राहिल असाच प्रयत्न दोन्ही कॉंग्रेसवाल्यांचा राहिला. पंधरा वर्षें सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला दोन्ही कॉंग्रेस जबाबदार आहे. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

कोल्हापूर : "शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाते की काय, अशी भीती पवारांना वाटते आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यासाठी पवारांचे कुणी हात बांधले होते का ? ', अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 

जेष्ठ नेते शरद पवार यांनी संपाबाबत "शेतकरी युद्धात जिंकले आणि तहात हरले' असे वक्तव्य केल्याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेत असताना दोन्ही कॉंग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला कॉंग्रेसवालेच जबाबदार आहेत. पवारांना शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री होता तेव्हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यासाठी पवारांचे कुणी हात बांधले होते का? आता बेछूट आरोप करत सुटलेत. अधून मधून ते भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर बोलतात. राज्यात धरणांची कामे अपुर्ण का राहिली ? धरणे न झाल्याने कालवे झाले नाहीत. अपुरे काम करण्यासाठी शासनाने नाबार्डकडून 24 हजार कोटींचे कर्ज काढले. गेल्या पंधरा वर्षात जे झाले नाही ते गेल्या अडीच वर्षापासून करण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत. शासन कालही शेतकऱ्यांच्या मागे होते आणि भविष्यातही राहिल, असे चंद्रकांतदादा म्हणाले. 

 

संबंधित लेख