Chandrakant Patil surprises his friends & party workers | Sarkarnama

कार्यकर्त्यांना आनंदाचा धक्‍का देणारे चंद्रकांतदादा 

सदानंद पाटील 
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

दिवाळीच्या काळात असे शेकडो कार्यकर्त्यांना आनंदाचा धक्‍का देण्याचे काम पालकमंत्री चंद्रकांत पाटील अनेक वर्षं करत आहेत . 

कोल्हापूर  : दिवाळीच्या काळात घरा-घरात असणारी धामधुम...प्रसन्न वातावरण...लहान मुलांचा किलबिलाट....संपूर्ण कुटुंब दिवाळीचा उत्सव साजरा करत असतानाच....घराबाहेर येणारा लाल दिव्यांचा ताफा....गाड्यांच्या भोवती सभोवतालच्या लोकांची गर्दी....गर्दीतील लोकांना शुभेच्छा देतच पांढऱ्या शर्टातील ही हसतमुख व्यक्‍ती कार्यकर्त्याच्या घरात पोहोचते आणि या घरातील लोकांना एक आनंदाचा मोठा धक्‍का बसतो....दिवाळीच्या काळात असे शेकडो कार्यकर्त्यांना आनंदाचा धक्‍का देण्याचे काम पालकमंत्री चंद्रकांत पाटील अनेक वर्षं करत आहेत !

सर्वसामान्य कार्यकर्ता, आमदार आणि राज्याच्या मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या खात्याचे मंत्री अशी चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. मात्र आपल्या या प्रवासात शेकडो हात मदतीला असतात, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच ते या कार्यकर्त्यांना विसरत नाहीत.

वर्षभर राजकीय उलथापालथी, महत्वाचे निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यात ते व्यग्र असतात .  जिल्ह्यासह राज्यातून सार्वजनिक व वैयक्‍तीक कामासाठी येणारी हजारो माणसे त्यांना भेटू जात असतात .   याशिवाय पक्षाच्या आणि जनतेच्या  अपेक्षा पूर्ण करत असताना   बऱ्याचवेळा कुटुंब, मित्र परिवार, सहकारी, पक्षाचे कार्यकर्ते, सोबत असणारे कर्मचारी यांच्या चौकशीला फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे वर्षातून एकदा दिवाळीच्या काळात या सर्वांच्या घरी भेटी देवून त्यांना सुखद धक्‍का देण्याचे काम चंद्रकांतदादा अनेक वर्षं करत आहेत. 

दिवाळीमध्ये किमान चार ते पाच दिवस चंद्रकांतदादांचा मुक्‍काम हा कोल्हापुरातच असतो. सकाळी घरी येणारे कार्यकर्ते,पाहुणेमंडळींना भेटून मग ते शहरासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, मित्रमंडळींच्या घरी न चुकता आवर्जुन जातात.

मंत्रीपदाचा कोणताही लवलेश न बाळगता, कार्यकर्ता छोटा की मोठा असा भेदभाव न ठेवता, तो खापरीच्या घरात राहतो की बंगल्यात राहतो, याची चर्चा न करता थेट ते त्याच्या घरी जातात. आपुलकीनं ते या मित्रंमडळी आणि कार्यकर्त्याची त्याच्या कुटुंबाची चौकशी करतात. काही मदतीची गरज असल्यास ती बिनबोभाट करतात.

बरोबर आणलेली भेटवस्तू देवून या कार्यकर्त्याच्या घरातील गोडधोड खावून दादा या कार्यकर्त्याचा निरोप घेतात. पालकमंत्र्यांची ही भेट कार्यकर्त्याला वर्षभर स्फूर्ती देते. वर्षभरात फार अभावानेच भेटणारे चंद्रकांतदादा दिवाळीच्या काळात मात्र आवर्जुन भेटतात...त्यामुळे वर्षभरात कार्यकर्त्यांची निर्माण झालेली प्रेमळ नाराजी या भेटीतून दूर होते !

 

संबंधित लेख