चंद्रकांत पाटील, तटकरेंनी घेतली राणेंची भेट , भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम 

नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांवर आरोप करत पक्षत्याग केला असला तरी त्यांचे आमदारपुत्र नितेश यांनी या बंडापासून दूर राहणे पसंत केले आहे. नितेश यांनी राजीनामा दिल्यास कॉंग्रेस सदस्यांची विधानसभेतील संख्या राष्ट्रवादीपेक्षा कमी होईल. त्यामुळे कॉंग्रेसने नितेश यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
narayan rane-chandraknatdada patil
narayan rane-chandraknatdada patil

मुंबई  :  कॉंग्रेसमुक्‍त झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकीय वाटचालीची आगामी दिशा ठरवण्यासाठी दिल्लीकडे निघणार असतानाच भाजपश्रेष्ठींनी त्यांच्याबाबत काय करायचे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे, असे सांगितले असल्याचे समजते. 

राणे यांच्या संभाव्य प्रवेशाला मुख्यमंत्री पूर्णत: अनुकूल नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी राज्यातील भाजपचे क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. आपण राणे यांना खाते देण्याचे विधान केले नव्हते, असे पाटील यांनी त्याआधी म्हटले होते.

या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही शुक्रवारी सायंकाळी राणे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्यासमोर प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी आमदारकीचा राजीनामा देताना राणे यांनी कॉंग्रेस व शिवसेनेवर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी त्यांनी कोणतेही अनुद्‌गार काढले नव्हते.

नागपूर, औरंगाबाद, नाशिक या मुख्य शहरांत आपल्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचा निर्धार राणे यांनी घोषित केला असला तरी ते एक-दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहेत, असे समजते. सिंधुदुर्गात भव्य रुग्णालय उभारायचे असून, त्यासाठी परवानगी घेण्यासाठी, तसेच उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी आपण भाजप नेते अमित शहा यांची भेट घेणार आहोत, असे राणे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या उद्‌घाटनाला हजर राहावे, अशीही राणेंची इच्छा आहे. त्यांचे भाजपमध्ये जाणे निश्‍चित असल्याचे काही निकटवर्तीय सांगत असले तरी भाजपमधून अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.

राणे यांच्या प्रवेशाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत शिवसेना सरकारला "जय महाराष्ट्र' करणार काय, यावर विचार करणे आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे शिवसेनेविषयी फारसे अनुकूल मत नाही, असेही मानले जाते. 

राणे यांचा पक्षवाढीला उपयोग होत असेल, तर तो करून घ्यावा, असे त्यांच्याशी आधीपासूनच उत्तम संबंध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत आहे. याविषयीचा निर्णय महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घ्यावा, असेही त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच राणेंच्या दिल्ली वारीत शहा नेमका काय कौल देतील, याविषयी उत्सुकता आहे. 

शहा यांच्याशी चांगला संपर्क असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी राणेंची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस त्या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त नागपूरमध्ये होते. ते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या परतीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशीही चर्चा आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यांच्यासाठी कोणतेही खाते सोडण्यास तयार असल्याचे यापूर्वी म्हटले होते; मात्र ते प्रसिद्धिमाध्यमांनी अयोग्य प्रकारे मांडले, असे त्यांनी आता म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी राणेंची घेतलेली भेट भुवया उंचावणारी ठरली आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही भेट घेतली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com