chandrakant patil reply on mushriff's alligation | Sarkarnama

मुश्रीफ अजून सत्तेत असल्यासारखेच वागतात, हे काही बरोबर नाही!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला आमदार मुश्रीफांनाच जबाबदार धरावे.

कोल्हापूर : महापौर निवडीत काही गडबड झाली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी धमकीच आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. याचाच अर्थ काहीतरी घडवण्याची तयारी आमदार मुश्रीफच करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला आमदार मुश्रीफांनाच जबाबदार धरावे, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच प्रशासनाने त्यांच्या वक्‍तव्याची गंभीर दखल घ्यावी, अशी सुचना त्यांनी केली. 

आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका नगरसेवक अपात्रतेच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरले होते. तसेच जर महापालिका निवडणुकीत संबंधित नगरसेवकांना मतदान करण्यापासून रोखले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल आणि या सर्व प्रकारास पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच जबाबदार राहतील, असे वक्‍तव्य केले होते. त्याला आज पालकमंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 

चंद्रकांतदादा म्हणाले, अजूनही आमदार मुश्रीफ हे सत्तेत असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळेच ते दरवेळी दमदाटीची भाषा करतात. अशापध्दतीचे वक्‍तव्य करुन ते प्रशासनावर दबाव आणत आहेत. खरे तर जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने हातातून गेल्याने आमदार मुश्रीफ अस्वस्थ आहेत. त्यातूनच ते अशी वक्‍तव्ये करत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात काहीही झाले तरी चंद्रकांत पाटलांचा हात, अशा पध्दतीने वक्‍तव्य करण्यात येत आहे, हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्री पाटील म्हणाले, मुश्रीफांच्या कारखान्याचे दुषित पाणी नदीत, बोअरवेलमध्ये मिसळले. तेथील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र मुश्रीफांनी बळाच्या जोरावर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हे जगजाहीर आहे. तर याच प्रदूषण प्रश्‍नावर अधिकाऱ्यांनी मुश्रीफांचा साखर कारखाना बंद करण्याची नोटीस काढली. मात्र अधिकाऱ्यांवरही दबाव टाकून त्याला ही नोटीस बदलायला लावली. आमदार मुश्रीफ हे अजूनही सत्तेत असल्यासारखेच वागत आहेत, हे काही बरोबर नाही, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख