chandrakant patil meets mla bhaskar patil | Sarkarnama

भास्करराव, तुमच्यासारखा माणूस झोपून राहता कामा नये : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

भाजप नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या भेटीत त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

चिपळूण (रत्नागिरी) : भाजप नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या भेटीत त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री पाटील कोकणात आले होते. या महामार्गाची दुरवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते येणार म्हणून आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर होत्या. प्रत्यक्षात चिपळूणमध्ये पोहचेपर्यंत भास्कर जाधव कुठेही दिसले नाहीत म्हणून मंत्री पाटील यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याचे सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी सांगितले. 

शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच व्यस्त वेळापत्रक असताना वेळ काढून ते आमदार जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आस्थेने त्यांची चौकशी केली. जवळपास अर्धा तास ते थांबले होते. तुमच्यासारखा माणूस असा झोपून राहता कामा नये. त्यामुळे लवकर बरे व्हा आणि बाहेर पडा, असे पाटील म्हणाले. आमदार जाधव यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांनी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख