chandrakant patil about mla sudhir gadgil role in sangli | Sarkarnama

सुधीर गाडगीळांच्या स्वच्छ चेहऱ्यामुळे भरघोस मतदान झाले : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

महापालिका निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ यांचा स्वच्छ चेहरा आम्ही मतदारांसमोर ठेवला होता. त्यांनी केलेल्या कामामुळे आम्हाला नागरिकांनी भरघोस मतदान केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

सांगली : महापालिका निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ यांचा स्वच्छ चेहरा आम्ही मतदारांसमोर ठेवला होता. त्यांनी केलेल्या कामामुळे आम्हाला नागरिकांनी भरघोस मतदान केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

निवडणुकीच्या ऐन धामधुमीत सांगलीतील महावीर उद्यान व आमराईत सकाळच्या प्रहरी नागरिकांना "मॉर्निंग मंत्रा' दिल्यानंतर आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी उद्यानात येऊन विजयाचा पेढा भरवला. सांगली परिसरातील बागबगिचे, नाना-नानी पार्क, चिल्ड्रन पार्क विकसित करून ते नागरिकांना खुले करण्याचे आश्‍वासन दिले. 

महापालिका निवडणुकीची प्रमुख धुरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांभाळली होती. अनेक सभांमधून त्यांनी विकासाचा अजेंडा नागरिकांसमोर ठेवला होता. प्रचाराची रणधुमाळी उठली असताना एक दिवस रामप्रहरी महावीर उद्यान आणि आमराईत फेरफटका मारला. सकाळच्यावेळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, वकील-डॉक्‍टर, निवृत्त मंडळींना भेटून विविध विषयांवर चर्चा केली. भाजपने राज्यात केलेल्या विकासकामांचा दाखला देताना त्यांनी सांगलीत सत्ता आल्यानंतर काय करणार? याचीही माहिती दिली. दादांनी सकाळच्यावेळी मतदारांशी संपर्क साधून "मॉर्निंग मंत्रा' दिल्याची चर्चाही त्यावेळी रंगली. 

निवडणूक निकालात मतदारांनी भाजपला पसंती दर्शवल्यामुळे आभार मानण्यासाठी आज विजय मेळावा आयोजित केला आहे. यानिमित्ताने आज पहाटे सांगलीत दाखल झालेल्या दादांनी महावीर उद्यान आणि आमराईत फेरफटका मारला. ज्येष्ठ नागरिक, डॉक्‍टर-वकील, निवृत्त मंडळींना भेटून सांगलीची सत्ता हाती दिल्याबद्दल विजयाचा पेढा भरवला. भाजपला विजयी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. वाळवेकर आदी यावेळी उपस्थित होते. 
 

संबंधित लेख