chandrakant patil about maratha reservation | Sarkarnama

मी वारंवार सांगत होतो, काळा कोट घालून लोक तयार आहेत!

सदानंद पाटील 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गनिमीकावा करुन आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

कोल्हापूर : मराठा आरक्षण देण्यासाठी अनेक लोकांनी अडथळे आणले. मात्र मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गनिमीकावा करुन आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. रात्री अपरात्री याबाबत काहीही अपडेट असेल ती आम्ही एकमेकांना शेअर करत होतो. मराठा आरक्षणाची इत्थंभूत माहिती आम्ही दोघांकडीच होती, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. 

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण कसे मिळाले आणि ते टिकवण्यासाठी काय उपाययोजना सुरु आहेत, याची माहिती दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, 16 टक्‍के आरक्षण जाहीर झाले 30 नोव्हेंबरला, 1 डिसेंबरला गॅझेट झाले आणि आज पहिली पिटीशन दाखल झाली आहे. हे सर्व होणार, या सर्वाची आम्हाला कल्पना होती. म्हणून मी वारंवार सांगत होतो, काळा कोट घालून लोक तयार आहेत, बटणं फक्‍त लावायची बाकी आहेत, ते यासाठीच, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. पुढील शक्‍यता गृहीत धरुनच मी गनिमीकाव्याने जावू, असे सांगत होतो. हे मी का सांगत होतो, हे आता सर्वांना समजले असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

आरक्षण लागू करताना खूप अभ्यास करण्यात आला आहे. पुढे काय धोके आहेत, याची माहिती घेतली आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत रहावे, यासाठी आपण खूप मेहनत घेत आहोत. आरक्षणाची बाजू उच्च न्यायालयात मांडण्यासाठी सुप्रसिध्द कायदेतज्ञ हरिष साळवे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला 20 टॉपचे वकील देण्यात आले आहेत. ज्या वकिलांना भेटण्यासाठीही फी द्यावी लागते, असे वकील आपण देत आहोत. दरवेळी ऍड. साळवे उच्च न्यायालयात येणे शक्‍य नसल्याने त्यांना सहकार्य करण्यासाठी ही वकिलांची फौज दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख