chandrakant patil about jayant patil | Sarkarnama

जयंत पाटील हे तर 'माजी नेते' ! 

बलराज पवार 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

चंद्रकांतदादांनी सांगलीतील भाषणाच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्राच्या एकाधिकारशाहीला आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडी विशेषकरुन राष्ट्रवादी त्यांना काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता आहे. 

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे जिल्ह्याचे 'माजी' नेते आहेत. ते आता जिल्ह्याचे नेते राहिलेले नाहीत. त्यांचे नेतृत्व संपले आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटी यांनी टोला हाणला. 

सांगलीत नेमिनाथ नगरमध्ये भाजपचे महापालिकेचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांतदादांनी, जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या संस्थांवर आता भाजपची सत्ता आल्याने जयंत पाटील हे जिल्ह्याचे नेते राहिले नाहीत. ते "माजी नेते' बनल्याचा टोला हाणला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक ही जयंत पाटील यांची पहिलीच निवडणूक होती. त्यांनी कसून प्रयत्न करुनही भाजपने त्यांच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीचा पराभव केला. त्यामुळे सांगलीतील कार्यक्रमात जयंत पाटील यांचा उल्लेख त्यांनी "माजी नेते' असा करत त्यांचे नेतृत्व संपल्यातच जमा असल्याचा इशारा दिला. 

एकेकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक या सर्व महत्वाच्या संस्थांवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे वर्चस्व होते. सगळे आमदार याच पक्षांचे असायचे. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्ह्याचे नेते मानले जात होते. मात्र आता जिल्ह्यात चार आमदार, खासदार, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका या सगळ्या ठिकाणी भाजपची सत्ता आल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना आपल्या भाषणात लक्ष्य केले. चंद्रकांतदादांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पश्‍चिम महाराष्ट्रावरील एकाधिकारशाहीलाही चुचकारले. "हा आमचा बालेकिल्ला असे कुणी समजू नये. पश्‍चिम महाराष्ट्र कुणाची जहागिरी नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुर्ण यश आणि सातारा जिल्ह्यात एखाद-दुसरी जागा सोडली तर सर्व ठिकाणी भाजपच असेल. असा इशाराही त्यांनी आघाडीला दिला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रावर कुणाचा हक्क यावरुन शाब्दिक द्वंद्व झडल्यास आश्‍चर्य वाटू नये. सांगली महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अवघड होती. तिची तुलनाही केरळ आणि पश्‍चिम बंगाल या डाव्यांच्या बालेकिल्ल्याशी चंद्रकांतदादांनी केली. त्यामुळे सांगली महापालिका जिंकल्याने आता केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्येही भाजपला विजय मिळवणे अवघड नाही असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

 

संबंधित लेख