चंद्रकांतदादा, आपल्या पीएंना आवरा!

चंद्रकांतदादा, आपल्या पीएंना आवरा!

पुणे, ता. 30 ः महसूल आणि बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पीए मंडळींनी या दोन्ही खात्यांतील अधिकाऱ्यांना बेजार केले असून, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. 
चंद्रकांतदादा हे साधे राहतात. अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतात. त्यांचा इतर त्रासही काही नसतो, असे अधिकारी आवर्जून सांगतात. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या पीएंचे विविध किस्से कानी पडत आहेत. "मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम', असे वर्णन खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. चंद्रकांतदादांचे काही पीए या व्याख्येत सूट होणारे आहेत. 
पुण्यात नुकतीच भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनिमित्त दादा दोन दिवस पुण्यात होते. या बैठकीला येणाऱ्या मंत्र्यांची आणि आमदारांची सोय ही "सयाजी' या तारांकीत हॉटेलमध्ये करण्यात आली होती. या पीएंचीही सोय याच हॉटेलमध्ये होती. (एवढा वट या पीएंचा आहे.) मात्र ते आपल्याला पसंत नाही, त्यापेक्षा उंची हॉटेलची मागणी या पीएंनी केली. चांगल्या वाहनापासून ते दारूच्या बाटल्या मागण्यापर्यंत काहींची मजल गेली. ही मागणी करताना आपण पुरूष अधिकाऱ्याशी बोलतो आहोत की महिलांशी, याचे भानही या पीएंना राहिले नाही. त्यांच्या त्रासामुळे पुण्यातील अधिकारी वैतागून दोन दिवस गेले. 
अधिक माहिती घेता काही पीएंची आधीची कारकिर्द वादग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. पीए म्हणून वावरणारा एक जण आधीचा तलाठी होता. लाच घेतल्याबद्दल तो निलंबितही झाला होता. चंद्रकांतदादांच्या एका जवळच्या नातेवाइकाकडे त्याचे येणेजाणे होते. दादांशी त्याची आधीपासून ओळख होती. दादा मंत्री झाल्यानंतर तो त्यांना चिकटला. दादांकडे महसूल खाते असल्याने या "दिवाण'जीचा भाव चांगलचा वाढला आहे. तो महसूलमधील किडा असल्याने कोणत्या फाइलचे मूल्य कसे आहे, हे ठरविण्यात तो पटाईत असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या एका पीएची "गाडी' जोरात सुटली आहे. त्याच्या तोंडाला आणि मागणीला काही घरबंध राहिला नसल्याचे बोलण्यात येते. त्याची "अप्पा'गिरी मंत्र्यांना एक दिवस महागात पडणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातील भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या एकाने कोल्हापुरात आपले चांगले बस्तान बसविले आहे. लवकरच त्याची गणना कोल्हापुरातील श्रीमंत व्यक्तीत होण्याची चिन्हे आहेत. लेखापरीक्षक विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने आपल्याकडेच दोन्ही खात्याची "पॉवर ऑफ ऍटर्नी', अशा जोशात कोल्हापुरात मांडवली सुरू केली आहे. पुणे ते कोल्हापूर पट्ट्यातील दोन्ही खात्यांचे अधिकारी प्रोटोकॉलच्या नावाखाली वैतागले असल्याचे बोलण्यात येते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com