हा माझा नाही शिवसेनेचा अपमान : खासदार खैरे 

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात आमदार अतुल सावे यांनी माझा अपमान केलाय. ते ज्या मस्तीत वागले त्याचा शिवसेना नक्कीच बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्याचा खासदार, शिवसेनेचा नेता आणि पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून मी या विवाह सोहळ्याला उपस्थित होतो. वधू-वर दोन्ही पक्षाकडून मला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे हा केवळ माझा नाही तर शिवसेनेचा अपमान आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सकाळशी बोलतांना दिली. 

आमदार संतोष दानवे व रेणू सरकटे यांचा विवाह गुरुवारी औरंगाबादेत थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य व केंद्रातील मंत्री उपस्थित होते. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांची, मंत्र्यांची बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्र्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या खासदार खैरे यांना भाजप आमदार अतुल सावे यांनी 'इथे मुख्यमंत्री व इतर मंत्री बसणार आहेत तुम्ही बसू नका तुमची व्यवस्था मागच्या रांगेत करण्यात आली आहे' असे म्हणत अपमानित केल्याचा प्रकार घडला. यावर संतप्त झालेल्या खैरे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

सावे मस्तीत वागले 
सरकटे व त्यांच्या कुटुंबीयांशी माझे घरगुती संबंध आहेत, त्यांची मुलगी माझी मुलगी समजून त्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे मी या समारंभाला गेलो होते. दानवे यांनी देखील मला सन्मानाने आमंत्रित केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या समारंभाला हजर राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या आदेशानेच मी लग्नाला आलो होतो. पण आमदार अतुल सावे हे मस्तीत वागले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच मला व्यासपीठावर नेऊन खुर्चीवर बसवले होते. पुण्याचे खासदार संजय काकडे व मी बोलत असतानाच सावेंनी मला खुर्चीवरुन उठण्यास सांगितले. त्यावर 'मला बोलावण्यात आले आहे, तुमच्याच लोकांनी इथे बसवले मग उठायला कसे सांगता, मला उठवणार असाल तर मी निघून जातो' असे मी म्हणालो. अर्जुन खोतकर, संजय शिरसाट व संदीपान भुमरे यांना देखील हे खटकले व त्यांनी निघून जाण्याची तयारी दर्शवली. पण लग्नात आपल्यामुळे विघ्न नको म्हणून मी शांत बसलो. सावे यांनी असाच प्रकार संजय काकडे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बाबतीत देखील करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना या दोघांनी भीक घातली नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करत सावेंना हुसकावून लावले, तसेच आणखी खुर्च्या ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

आम्ही मोदींसोबत बसतो 
मुख्यमंत्री बसणार असे सांगून माझा अपमान करणाऱ्या अतुल सावे यांना माहीत नाही का, की आम्ही दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी व सोबत बसतो? मी एनडीएतील नेता, केंद्राच्या अनेक समित्यांचा अध्यक्ष व सदस्य आहे. त्यामुळे सावेंनी मला कुठे बसावे हे शिकवू नये. मुळात एवढ्या मोठ्या कार्याचे नियोजन करतांना काळजी घेतली गेली नाही. दानवे यांच्या कार्यात सावेंनी केलेला हा अपमान माझा नाही तर शिवसेनेचा आहे असे मी समजतो. शिवसेना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. रावसाहेब दानवे यांना देखील आपण या संदर्भात पत्र पाठवून नाराजी व्यक्त करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. 

माफी मागा 
लग्नाला बोलावून शिवसेनेचा अपमान करणाऱ्या सावेंनी माझी व शिवसेनेची माफी मागावी अशी मागणी आपण दानवे व भाजपकडे करणार असल्याचेही श्री. खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com