chandrakant khaire aurangabad mp | Sarkarnama

कचराआंदोलनावेळच्या पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा- चंद्रकांत खैरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी व पोलीसांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांना भरपाई द्यावी, वाहनांचे नुकसान भरुन देण्यात यावे व आंदोलकांवर दाखल केलेले दंगलीचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

औरंगाबाद : शहराजवळील मिटमिटा परिसरात महापालिकेची कचरा घेऊन जाणारी वाहने ग्रामस्थांनी पेटवून दिल्यानंतर पोलीसांनी बळाचा वापर करत केलेल्या कारवाईची न्यायलयीन चौकशी करा व पोलीसांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या अशी मागणी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

चंद्रकांत खैरे यांच्यासह आमदार संजय सिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी आज (ता. 9) पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मिटमिटा येथील गट क्रंमाक 307 व 54 मध्ये बुधवारी महापालिकेच्या कचऱ्याचे ट्रक पोलीस बंदोबस्तात निघाले होते. त्याला पडेगांव येथे जमलेल्या शेकडो आंदोलकांनी विरोध करत दगडफेक केली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पोलीसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार केला होता. 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीसांनी गावात कोम्बींग ऑपरेशन दरम्यान, ग्रामस्थांच्या वाहनांचे नुकसान, घरात घुसून टिव्ही, फ्रीजसह इतर साहित्याची देखील तोडफोड केली होती. रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलीस फोडत असल्याचे फुटेज देखील समोर आले होते. 

या पार्श्‍वभूमीवर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाट व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिटमिटा गावाला भेट देऊन ग्रामस्थांची चौकशी केली तेव्हा देखील पोलीसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. याची दखल घेत आज सकाळी शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्‍तांच्या भेटीला गेले होते. 

या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी व पोलीसांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांना भरपाई द्यावी, वाहनांचे नुकसान भरुन देण्यात यावे व आंदोलकांवर दाखल केलेले दंगलीचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

संबंधित लेख