chandrakant handore new incharge of pune congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

चंद्रकांत हंडोरेंबद्दल किती कॉंग्रेसजनांना माहिती आहे? 

उमेश घोंगडे  
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

महापालिका निवडणुकीच्या काळात पुण्याच्या कॉंग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे पुरते पानिपत झाले. निवडणुकानंतर ही जबाबदारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे देण्यात आली. मात्र, गेल्या सहा महिन्याच्या काळात याची फारशी माहितीदेखील सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्याला नाही, अशी परिस्थिती आहे. 

पुणे: महापालिका निवडणुकीच्या काळात पुण्याच्या कॉंग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे पुरते पानिपत झाले. निवडणुकानंतर ही जबाबदारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे देण्यात आली. मात्र, गेल्या सहा महिन्याच्या काळात याची फारशी माहितीदेखील सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्याला नाही, अशी परिस्थिती आहे. 

गेल्या दोन महिन्यात पुण्यातील पक्ष संघटनेची स्थिती आणखी बिकट झाली आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे आपल्या पातळीवर काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शहरातील नेत्यांमध्ये मेळ नसल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. रमेश बागवे यांच्याशिवाय माजी अध्यक्ष अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, आबा बागुल, संजय बालगुडे हे सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र या साऱ्यांचे प्रयत्न आपल्या पातळीवर होताना दिसत आहेत. मात्र त्यास संघटनात्मक बळ मिळताना दिसत नाही. महापालिका निवडणुकीतील ऐतिहासिक अपयशानंतर तरी कॉंग्रेस एकसंध होईल ही अपेक्षा धुळीला मिळाली असून उलट आणखी गटा-तटात विभागलेली दिसत आहे. या साऱ्या गटा-तटाच्या राजकारणात कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा येत आहे. पुण्यातील कॉंग्रेस सलग 15 वर्षे ज्यांच्या एकहाती नेतृत्वावर चालली ते माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे राजकारण आता जवळपास संपल्यात जमा आहे. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वजीत कदम यांच्याकडे पुण्याचे नेतृत्व द्यायला कॉंग्रेसश्रेष्ठी तयार नाहीत. मुळात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्यातील शितयुद्धाचा फटका पुण्यातील पक्ष संघटनेला बसत आहे. पुण्याचे नेतृत्व करण्यात सक्षम असलेल्या कदम पिता-पुत्रांकडे केवळ वरिष्ठ नेत्यांमधील शितयुद्धामुळे जबाबदारी दिली जात नसल्याची चर्चा आहे. या साऱ्या हेवेदाव्यांमध्ये कॉंग्रेस संघटना आणखी गाळात चालली हे मात्र खरे आहे. रमेश बागवे काम करण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्व गटांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे कसब त्यांना अद्याप तरी जमताना दिसत नाही. 

संबंधित लेख