chandrakant gudewar issue | Sarkarnama

चंद्रकांत गुडेवार यांची शिक्षेच्या विरोधात याचिका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

विधिमंडळ हक्कभंगप्रकरणी झालेल्या शिक्षेला अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हक्कभंगाच्या माध्यमातून राजकीय वचपा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुडेवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. 

नागपूर : विधिमंडळ हक्कभंगप्रकरणी झालेल्या शिक्षेला अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हक्कभंगाच्या माध्यमातून राजकीय वचपा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुडेवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. 

अमरावती महापालिकेचे आयुक्त असताना चंद्रकांत गुडेवार यांचे भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख (अमरावती) यांच्याशी वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून आमदार डॉ. देशमुख हक्कभंग झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी डॉ. देशमुख यांनी विधिमंडळात हक्कभंग दाखल केला होता. या प्रकरणी गुडेवार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

गुडेवार यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत राज्य सरकार, मुख्य सचिव, विधिमंडळाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव, राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 
पंतप्रधान घरकुल योजनेचा विषय हा विधिमंडळाच्या बाहेरचा आहे. या योजनेतील लाभार्थींची यादी डॉ. देशमुख यांना न दाखविता कार्यवाही करण्यात आली. यातून विधिमंडळाचा अवमान कसा झाला? असा प्रश्‍न याचिकेत उपस्थित केला आहे. 

या योजनेची चांगल्या रीतीने अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्रीय शहरी गरिबी उन्मूलन मंत्रालयाने गुडेवार यांची प्रशंसा केली आहे. ही योजना चांगल्यारीतीने राबविल्याबद्दल केंद्र सरकारने दिलेली प्रशस्तिपत्रे गुडेवार यांनी याचिकेसोबत जोडले आहेत. यावरून केवळ राजकीय वचपा काढण्यासाठी हक्कभंग दाखल करण्यात आल्याचा दावा गुडेवार यांनी केला आहे.

संबंधित लेख