chandrakant dada patil | Sarkarnama

आता लोकसभेसाठी भाजपकरता चारशे जागांचे उद्दिष्ट - चंद्रकांतदादा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

या कामाची पक्षाचे प्रमुख म्हणून या दोघांवर जबाबदारी दिली असली तरी भाजपाचे कार्यकर्ते सुहास लटोरे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या कामात स्वताला झोकून द्यावी. प्रत्येक 25 घरामागे एक कार्यकर्ता या प्रमाणे प्रत्येक बूथ लेव्हलवर जाउन कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामामध्ये स्वताला झोकून द्यावे. कांहीही झाले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 400 जागा जिंकून द्यायच्या आहेत.

कोल्हापूर : समान नागरी कायदा करणे, घटनेतील 370 वे कलम रद्द करणे आदीसह भाजपाला देशात हवे असलेले बदल करायचे झाल्यास लोकसभेच्या 400 जागा जिंकायचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवले असून कांहीही झाले तरी या जागा जिंकायचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ठेवले असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे बोलताना दिली. कोल्हापूर महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अमल महाडीक, ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडीक यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. 

महसूलमंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, सध्या केंद्रात,राज्यासह देशाच्या विविध भागात भारतीय जनता पार्टीचेच सरकार आहे. देशातील दिल्ली आणि पश्‍चिम बंगाल वगळता सर्वत्र भाजपाची आणि मित्रपक्षाची सत्ता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता केंद्रात आली. आता दीड वर्षानंतर लोकसभेच्या पुन्हा निवडणुका आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. त्यादुष्टीने पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. आपल्या परिसरातही कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. 

ते पुढे म्हणाले प्रत्येक कार्यक्रमात विविध प्रकारच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान पाच हजार कार्यकर्ते आपल्याला तयार करायचे आहेत. कोल्हापूर उत्तर मतदार संघ आणि कोल्हापूर दक्षिण मतदार संघ या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा एकत्रीत मेळावा लवकरच घ्या,अशा सूचना त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना दिल्या आहेत. 

या कामाची पक्षाचे प्रमुख म्हणून या दोघांवर जबाबदारी दिली असली तरी भाजपाचे कार्यकर्ते सुहास लटोरे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या कामात स्वताला झोकून द्यावी. प्रत्येक 25 घरामागे एक कार्यकर्ता या प्रमाणे प्रत्येक बूथ लेव्हलवर जाउन कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामामध्ये स्वताला झोकून द्यावे. कांहीही झाले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 400 जागा जिंकून द्यायच्या आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत प्राप्त झाले तर समान नागरी कायदा करणे, घटनेतील 370 वे कलम रद्द करणे यासह भाजपाला देशात हवे असलेले बदल करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. 

संबंधित लेख