chandrahar patil view about politics | Sarkarnama

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार म्हणतो, 'कुस्ती हाच माझा पक्ष'! 

संपत मोरे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अलीकडच्या काही दिवसांत राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत, त्यांनी सध्या विट्यात कुस्ती संकुल उभा करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. कोल्हापूर पुण्यासारखे कुस्ती संकुल विटयात उभा रहावे म्हणून पाटील सध्या प्रयत्नशील आहेत. 

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अलीकडच्या काही दिवसांत राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत, त्यांनी सध्या विट्यात कुस्ती संकुल उभा करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. कोल्हापूर पुण्यासारखे कुस्ती संकुल विटयात उभा रहावे म्हणून पाटील सध्या प्रयत्नशील आहेत. 

चंद्रहार पाटील यांचा राजकारणात प्रवेश तसा अपघातानेच झाला होता. जिल्हा परिषदेच्या आखाड्यात जेष्ठ नेते रामरावदादा पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रभावी उमेदवार राष्ट्रवादीला मिळत नव्हता तेव्हा अचानक चंद्रहार पाटील यांचे नाव आले. हा मतदारसंघ रामराव पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात होता. त्याच मतदारसंघात एकदा रामराव पाटील यांच्या विरोधात चंद्रहार पाटील यांचे वडील सुभाष पाटील यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

त्याच जागेवर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी होती. एकीकडे वयस्कर रामरावदादा आणि दुसरीकडे कुस्तीचं वलय असलेले चंद्रहार यामुळे लढत लक्षवेधी ठरली. या लढतीत लाल मातीतल्या या मल्लाने बाजी मारली. त्यानंतर चंद्रहार पाटील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांत दिसू लागले होते. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मात्र हळूहळू त्यांनी राजकारणाकडे लक्ष कमी केले आणि पुन्हा एकदा कुस्तीत लक्ष केंद्रित केले. तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळावी म्हणूनही त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. 

अलीकडच्या काही दिवसांत मात्र त्यांनी विट्यात कुस्ती संकुल उभा करण्याचा ध्यास घेतला आहे. ग्रामीण भागातील मल्लांना सर्वसोयींनीयुक्त कुस्ती प्रशिक्षण मिळावे असा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणापेक्षा कुस्तीकडे लक्ष दिलेले चंद्रहार पाटील म्हणतात, एक वर्षात कुस्ती संकुल उभा करणे हेच माझं ध्येय आहे. आता राजकारणापेक्षा कुस्ती हाच माझा पक्ष आहे. कधीकाळी लक्षवेधी निवडणूक लढवून जिंकलेल्या पाटील यांची हि प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे . 
 

संबंधित लेख