Challenge in front of Amit Deshmukh in Latur Municipal Elections | Sarkarnama

लातूर महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी अमित देशमुख यांच्यापुढे आव्हान

महेश पांचाळ
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लातूर महापालिकेत भाजपाने आतापर्यंत खाते उघडले नसले तरी, राज्यात निर्माण झालेल्या भाजपाच्या वाऱ्याबरोबर लातूर महापालिकेची सत्ता मिळविण्यात भाजपा यशस्वी होईल, असा विश्‍वास भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबियांप्रमाणे शहरी भागातील नागरिकांकडून काँग्रेसला कितपत स्वीकारले जाईल, ही काँग्रेसचे अमित देशमुख यांची परिक्षा आहे.

मुंबई- माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची कर्मभूमी म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखल्या जाणारा लातूर जिल्हा हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर लातूर शहरातील वारेही बदलायला लागले असून, उद्या 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लातूर महापालिका निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते याकडे लक्ष लागले आहे.

भाजपाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बहुमत मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी सचिवामार्फंत या निवडणुकांवर नजर ठेवली असल्याचे समजते.

लातूर ,चंद्रपूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये शत प्रतिशत भाजप असे यश मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून सुरु असला तरी, लातूर महापालिका निवडणुका जिंकणे हा आता भाजपातील नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनला आहे. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळेल, असा विश्‍वास वाटत आहे.

लातूर जिल्हा आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे. लातूर महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या 49, राष्ट्रवादीच्या 13, शिवसेना 6 आणि अपक्ष 2 असे संख्याबळ मिळाले आहे. पाण्याबरोबर कचऱ्याची समस्या जटील आहे. महापालिकेच्या हद्दीत 18 हजार लिकेज असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यातून पाणीकपातीचे संकट उभे राहिले, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

लातूर महापालिकेत भाजपाने आतापर्यंत खाते उघडले नसले तरी, राज्यात निर्माण झालेल्या भाजपाच्या वाऱ्याबरोबर लातूर महापालिकेची सत्ता मिळविण्यात भाजपा यशस्वी होईल, असा विश्‍वास भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबियांप्रमाणे शहरी भागातील नागरिकांकडून काँग्रेसला कितपत स्वीकारले जाईल, ही काँग्रेसचे अमित देशमुख यांची परिक्षा आहे.

विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लातूर शहरात नागरी सुविधा आणण्याच्या दृष्टीने कामे झाली होती. परंतु, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आता त्यांचे पूत्र अमित देशमुख हे आमदार असले तरी, गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य जनतेशी किती नाळ जूळवून घेतली हे लातूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची सूत्रे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी सचिवामार्फंत या निवडणुकीवर बारीक नजर ठेवली आहे.

संबंधित लेख