चाकण परिसरात धरपकडीची दहशत : बाहेरच्या तरुणांबरोबरच स्थानिकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा 

चाकणच्या हिंसाचारात बाहेरील तरुणांबरोबर स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे, असे पोलिसांचे मत आहे. मराठा समाजातर्फे मात्र बाहेरील तरुणांनी हा प्रकार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चाकण परिसरात धरपकडीची दहशत : बाहेरच्या तरुणांबरोबरच स्थानिकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा 

चाकण - मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, ता. ३० रोजी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून धरपकडसत्र सुरू केले आहे. रात्री, अपरात्री तरुणांना पोलिस पकडून नेत आहेत. सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. तरुणांची उचलबांगडी पोलिसांनी सुरू केल्याने बहुतांश तरुण गाव सोडून पळाले आहेत. ज्यांना पोलिस ठाण्यात आणले आहे त्यांचे नातेवाईक, विशेषतः महिला पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

चाकणच्या हिंसाचारात बाहेरील तरुणांबरोबर स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे, असे पोलिसांचे मत आहे. मराठा समाजातर्फे मात्र बाहेरील तरुणांनी हा प्रकार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी चाकण, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, रासे, भोसे, मेदनकरवाडी, काळूस, खालुंब्रे गावांतील तरुणांची धरपकड सुरू केली आहे. जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळतात, ज्यांच्या हातात काठ्या, दगड आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे; पण काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे ही आहेत ते फुटेजमध्ये न येता जमावात येऊन त्यांनी जाळपोळ, तोडफोड केली आहे.

नाणेकरवाडीत अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. नाणेकरवाडीत टोळीयुद्धातून एकावर खुनी हल्ला ही दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यातील आरोपी स्थानिक होते. तेथील काही गुन्हेगारांचे काही पोलिस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते गुन्हेगार काही पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची नावे सांगून त्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नाणेकरवाडी ग्रामस्थ, महिलांनी केला आहे. 

केवळ गावपुढारी काही गुन्हेगार सांगतात म्हणून संबंधित तरुणांवर कारवाई नको, असे नाणेकरवाडी येथील ग्रामस्थ, महिला यांचे म्हणणे आहे. आमच्या मुलांना विनाकारण गोवण्यात आले, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा, अशी मागणी नाणेकरवाडीचे पोलिस पाटील राजू नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव; तसेच महिलांनी केली आहे.

हिंसाचारात जे सहभागी झाले आहेत, ज्यांचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ क्‍लिप हाती लागल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. कोण प्रत्यक्षात सहभागी आहे, कोणी जाणूनबुजून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला आहे का, या सर्व बाबी ९ ऑगस्टनंतर पडताळून पाहून त्यांची निश्‍चित सुटका केली जाईल.
- संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com