chaitali kale speech in kopargaon | Sarkarnama

कोपरगावची काळजी घेणारा पती मिळाल्याचा आज मनस्वी आनंद होतो!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

उपोषण करू नका, असे मत मी आशुतोष यांच्यासमोर मांडले होते.

कोपरगाव (नगर): माझे पती दोन दिवसांपासून उपाशी आहेत. तुम्ही सर्व माझे दीर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समाधान वाटते. तालुक्‍याची काळजी घेणारा पती मिळाल्याचा आज मनस्वी आनंद होतो, अशा शब्दांत जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका चैताली काळे यांनी भावना व्यक्त केल्या. या वेळी अनेक कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी आज उपोषण मागे घेतले. त्या वेळी बोलताना चैताली काळे म्हणाल्या, "ज्येष्ठ नेते (कै.) शंकरराव काळे यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची मी नातसून आहे. आशुतोष काळे उपोषणास बसले; पण खऱ्या अर्थाने माझ्या छोट्या मुलाचे धन्यवाद मानले पाहिजेत. त्याला आशुतोष यांची सवय असल्याने मोठी अडचण झाली होती. पतीच दोन दिवस उपाशी असल्याने मीदेखील जेवण घेतले नाही. सासरे माजी आमदार अशोक काळे हे उपोषणस्थळी आले नाहीत; मात्र त्यांचीही दिवसभर घालमेल सुरू होती. गौतम बॅंकेत बसून ते काल व आज दिवसभर माहिती घेत होते.''

"उपोषण करू नका, असे मत मी आशुतोष यांच्यासमोर मांडले होते; पण तालुक्‍याची जनता, शेतकरी माझे आहेत. त्यांच्या व तालुक्‍याच्या पाण्यासाठी आजोबा (कै.) काळे व वडिलांनी संघर्ष केला. तो लढा जबाबदारी म्हणून मी अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचे आशुतोष यांनी सांगितले. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा पती मिळाल्याचा आनंद वाटतो. तुमच्यासारखे जिवाला जीव देणारे दीर मला मिळाले, याचे समाधान आहे. रात्री दोन वेळा मी उपोषणस्थळी भेट देऊन आशुतोष यांच्यासह सर्वांना झोपण्याच्या सोयीबाबत चौकशी केली,'' असे काळे म्हणाल्या. 

संबंधित लेख