आठवले म्हणाले...मोदी व मी चौकार ठोकतो; भुजबळ म्हणाले...आम्ही चांगल्या बॅटसमनना बाद करतो

लासलगाव येथील महावीर महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात छगन भुजबळ व रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी या दोन्ही नेत्यांमधल्या जुगलबंदीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली
Chagan Bhujbal-Ramdas Athavale
Chagan Bhujbal-Ramdas Athavale

लासलगाव : आगामी २०१९ च्या निवडणुकीचा सध्या सराव सुरू आहे. मी व मोदी चांगले बॅटसमेन असुन चौकार, षटकार ठोकतो, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगताच....आमच्याकडे चांगले गोलंदाज  आहेत. आम्ही बॅटसमनला बाद करतो, असं उत्तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

लासलगाव येथील महावीर महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात हे दोघेही नेते प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मी कुठल्याही पक्षा सोबत असलो तरी छगन भुजबळ हे माझे जवळचे मित्र आहेत. महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा छगन भुजबळ यांनी घेतला असून बहुजन समाजासाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे गौरोदगार त्यांनी काढले. 

आगामी निवडणुकी बाबत बोलतांना ते म्हणाले, "२०१९ ची मॅच जिंकण्यासाठी आमचा सराव सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि मी चांगली फलंदाजी करतो. फलंदाजी करतांना आम्ही नेहमीच चौकार आणि षटकार लगावतो." यावर छगन भुजबळ यांनी आमच्याकडे चांगले गोलंदाज असून आम्ही चांगले बॅटसमन बाद करू शकतो अशी टिपणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

देशात आरक्षण कमी करण्याचा सरकारचा डाव आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आयआयटी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. तसेच देशातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कमी होत असल्याने अनेक गोरगरिबांची मुले आज शिक्षणापासून वंचित राहत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कमी होणार नाही याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, भाजपचे सुरेश बाबा पाटील,आमदार किशोर दराडे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंढरीनाथ थोरे, अजय ब्रम्हेचा, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकर, नेमिनाथ जैन, शिवसेनेचे सुनील पाटील, सरपंच संगीता शेजवळ, संस्थेचे अध्यक्ष सुनील अब्बड, महावीर चोपडा, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, संतोष ब्रम्हेचा, मोहनलाल बगडीया,पारसमल साखला, रतन राका, प्राचार्य डुंगरवाल, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, शिवा पाटील सुराशे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माजी सरपंच कुसुमताई होळकर, आरपीआयचे शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com