"महिलेला लक्ष्मी म्हणता, तिच्या हातावर शंभर रुपये तरी ठेवता काय ?' : छगन भुजबळांचा सवाल 

"महिलेला लक्ष्मी म्हणता, तिच्या हातावर शंभर रुपये तरी ठेवता काय ?' : छगन भुजबळांचा सवाल 

नाशिक: "महिलेला तुम्ही लक्ष्मी म्हणता. तिच्या हातावर शंभर रुपये तरी देण्याची तयारी आम्हा पुरुष मंडळीत आहे काय ? सकाळपासून रात्रीपर्यंत महिला शेतात राबत असतात. तिच्या कष्टाची किंमत समजा, सरकार कोणतेही आले तरी करते का ? आपल्याला विकास हवा असेल तर ही मानसिकता बदलली पाहिजे.' असे परखड मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

येथील कृषीथॉन प्रदर्शनात राज्यातील यशस्वी महिला शेतकऱ्यांना भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "" आपण आज खरोखर महिलांकडून मार्गदर्शन घेण्याची वेळ आली आहे. महिलांना आपण लक्ष्मी म्हणतो. सरस्वती म्हणतो. दुर्गा म्हणुन तिला देवत्व बहाल केले आहे. मात्र हे सर्व वरवरचे आहे. जिला आपण लक्ष्मी म्हणतो तिच्या हातावर शंभर रुपये देण्याची दानत आपल्यात नसते.'' 

सरस्वती म्हणतो पण सात- आठ बुक शिकली की म्हणतो बस्स झाले. मुली शिकुण काय करणार ? दुर्गा म्हणतो पण जरा काही झाले की महिलांना म्हणतो तू घरात बस. मी काय ते बाहेरचे बघतो. या महिला निमुटपणे ते ऐकतात. सकाळ पासुन रात्रीपर्यंत घरच, शेतातलं पडेल ते सर्व काम करतात. सकाळ झाली की पुरुष मंडळी मोटारसायकल काढतात अन्‌ शिवसेनेचे काय चालले, भाजपचे काय चाललेय असे राजकारण करीत फिरतो. 75 टक्के महिला शेतात काम करतात. पण अवघी बारा टक्के महिलांच्या नावे शेती आहे. 

""माझ्याकडे अमेरिका, इस्त्राईलचे लोक आले होते. ते आपली जमीनही न घेता समुद्रात जहाज उभे करुन समुद्राच्या पाण्यातील मीठ काढुन पाच पैसे रुपये लिटरने द्यायला ते तयार होते. बारा- पंधरा रुपये लिटरचे पाणी आपण पितो. दुष्काळ पडल्यावरच मुंबईकर जागे होतात. पण बीयरवाले, फाईव्हस्टार हॉटेल्स, उद्योगांना का नाही समुद्राचे पाणी देण्याचा विचार होत ?' असा सवालही त्यांनी केला. 

यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्या आर्कीटेक्‍ट अमृता पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, संयोजक अश्विनी न्याहारकर, संजय न्याहारकर आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com