chagan bhujbal in beed for samata rally | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भुजबळांच्या पायाला पुन्हा भिंगरी : समता परिषदेचा पहिला मेळावा बीडमध्ये

दत्ता देशमुख
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक छगन भूजबळ आणि विभागीय आणि बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचे कौटुंबिक संबंध आहेत. समता परिषदेच्या पुर्नबांधणीसाठी राज्यभर मेळावे होत असून पहिल्या मेळाव्याची जबादारी सुभाष राऊत यांच्यावर विश्वासाने सोपविली आहे.

बीड : माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात काढल्याने समता परिषद कमकुवत झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या पुर्नबांधणीसाठी भुजबळ तयारीला लागले आहेत. त्याची सुरूवात शनिवारी बीडमध्ये होणार अाहे.

राज्यातल्या पहिल्याच समता मेळाव्याचे शिवधनुष्य त्यांनी विश्वासू शिलेदार विभागीय आणि बीड जिल्हाध्यक्ष  सुभाष राऊत यांच्या खांद्यावर टाकले आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी राऊत यांनीही जोरदार तयारी केली आहे.अखिल भारतीय समता परिषदेचे विभागीय आणि बीड जिल्हाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी असलेले सुभाष राऊत हे छगन भुजबळ यांचे विश्वासू आहेत.  भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला भेटलेल्या मोजक्यांमध्ये सुभाष राऊत हे देखील होते.

त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. अनेक मेळाव्यांना खुद्द छगन भुजबळ यांनीही हजेरी लावलेली आहे. तसेच, छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त ते दरवर्षी राज्यस्तरीय समता करंडक एकांकिका स्पर्धा घेतात. त्यालाही अनेक वेळा खुद्द भुजबळ यांची हजेरी राहीलेली आहे. तसेच बापूसाहेब भुजबळ, समीर भुजबळ आणि भुजबळांच्या कुटूंबातील महिलांचीही हजेरी असते.

राऊत यांच्याकडून आयोजित कार्यक्रमांचे निटसे नियोजन आणि गर्दी जमविण्याच्या हातोटीचा भुजबळांना चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे राज्यातला पहिल्या समता मेळाव्याच्या आयोजनाचा मान त्यांना दिला आहे.

दरम्यान, सत्तेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी समता परिषदेची जोरदार बांधणी करुन स्वत:ची स्वतंत्र ताकद निर्माण केली. या माध्यमातूनच ते राष्ट्रवादीतील प्रमुख ओबीसी नेते म्हणून ओळखले जात मात्र, भ्रष्टाचाराचे विविध आरोप आणि दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात काढावा लागला. या काळात पक्षात इतर ओबीसी नेत्यांचे महत्व वाढले आहे. तसेच, मागच्या अडीच वर्षांपासून भुजबळांचा संवादही तुटलेला असल्याने कार्यकर्त्यांत एकप्रकारची मरगळ आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भुजबळांनी पुन्हा समता परिषदेच्या माध्यमातून बहुजन आणि विशेषत:  ओबीसी समाजावरील त्यांची काहीही सैल झालेली पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी समता मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

बीडमध्ये मेळावा भव्य आणि यशस्वी होईल असा विश्वास असल्यानेच छगन भुजबळ यांनी बीडची निवड केल्याचे सांगीतले जाते. शनिवारी येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी सुभाष राऊत यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून त्यांचे जिल्हाभर दौरे सुरु असून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांनाही प्रतिसाद भेटत आहे. मेळाव्याला गर्दीच्या दृष्टीने वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चार वर्षांच्या खंडानंतर भुजबळ जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहेच. त्यामुळे छगन भुजबळ यांनी विश्वासाने पहिल्या मेळाव्याच्या आयोजन दिलेले शिवधनुष्य सहज पेलू असा विश्वास राऊत आणि समर्थकांचा विश्वास आहे. 

 

संबंधित लेख