Central government is active for release oF Kulbhushan : Bhamre | Sarkarnama

कुलभूषणच्या सुटकेसाठी  केंद्र प्रयत्नशील : डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

पाककडे भारतीय लष्कराविरोधात लढण्याचे बळ व हिंमत नाही, म्हणून ते काश्‍मिरातील युवकांना  दगडफेकीसाठी बळ देत छुपे युद्ध खेळत आहेत. तेथील वाढत्या हिंसाचाराबद्दल व लष्कराविरोधातील दगडफेकीबाबत वेगळा विचार सुरू असून त्याचा रिझल्ट' लवकरच मिळेल. 

पंचवटी: कुलभूषण जाधव हा हा "रॉ'चा एजंट असल्याचा पाकिस्तानचा आरोप धादांत खोटा आहे. नौदलातील नोकरीतील 
निवृत्तीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे अपहरण करून इराणमधून पाकमध्ये पळविण्यात आले. त्याबाबत वारंवार पुराव्यांची मागणी करूनही ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. केंद्र सरकार त्यांच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न करेल, असा विश्‍वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पंचवटीतील स्वामी नारायण विद्यामंदिर शाळेत कालपासून (ता. 28) अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी निवृत्त अधिकारी व सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भामरे आज उपस्थित होते. 

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक रोजच काहीतरी कुरापती काढत आहे. 
व्यवसायानिमित्त इराणला गेलेल्या नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव या व्यावसायिकास तेथून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आले.

कुलभूषण जर "रॉ'चे एजंट असल्याविषयी पुराव्यांची केलेली मागणी तब्बल वीस वेळा फेटाळण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. जाधव यांना बचावाची संधी देण्यासाठी सरकार वेळप्रसंगी पाकवर दबाव आणेल. पाकच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना बोलावून समज देण्यात आलेली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय श्री. जाधव यांना दिलेली शिक्षा हत्या समजू, असेही त्यांनी सांगितले. 

एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाककडे भारतीय लष्कराविरोधात लढण्याचे बळ व हिंमत नाही, म्हणून ते काश्‍मिरातील युवकांना 
दगडफेकीसाठी बळ देत छुपे युद्ध खेळत आहेत, असे सांगितले. तेथील वाढत्या हिंसाचाराबद्दल व लष्कराविरोधातील दगडफेकीबाबत वेगळा विचार सुरू असून त्याचा रिझल्ट' लवकरच मिळेल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्याच्या मुखमंत्रीपदी गेल्याने कामाचा ताण वाढला का? या प्रश्‍नावर सेवेची संधी मी "तणाव' समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीसगडमधील सुकुमामधील घटनांबाबत छेडले असता देशांतर्गत परिस्थिती हातळण्यात गृहमंत्री राजनाथसिंह सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.
 

संबंधित लेख