Central cabinet expansion Sahatrabudhhe to get ministerial berth | Sarkarnama

 केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात  शिवसेनेला दोन मंत्रिपदे ; भाजपतर्फे  सहस्त्रबुद्धेनां संधी  !

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षण किंवा वन आणि पर्यावरण.  

 अरुण जेटलींकडे एकच खाते राहणार. 

विनय सहस्रबुद्धे, प्रल्हाद पटेल, सुरेश अंगडी, सत्यपालसिंह, हिमंत बिस्व शर्मा, अनुराग ठाकूर, शोभा करंदलजे, महेश गिरी आणि प्रल्हाद जोशी यांचा मंत्रिमंडळात समावेश शक्‍य. 

"जेडीयू'ला रेल्वे खाते न दिल्यास, मनोज सिन्हांना बढती. 

 पोलादमंत्री वीरेंद्रसिंह यांच्याकडे दुसरे मंत्रालय. 

पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांना बढती. 

'जेडीयू'कडून आर. सी. पी. सिंह आणि संतोषकुमार यांना संधी शक्‍य. 

नवी दिल्ली :  बहुचर्चित  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रविवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या   विस्तारात   शिवसेनेला एक ऐवजी दोन मंत्रिपदे मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

शिवसेनेने एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने भाजपतर्फे  अल्पावधीतच राज्यसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या विनय सहस्रबुद्धे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो असे मानले जाते. 

बिहारमधील सत्ताबदलानंतर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत देण्याबरोबरच रेल्वेसारखे खाते मिळावे असेही सूचित केल्याचे समजते. शिवसेनेने एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. लोकसभेच्या आगामी (2019) निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार मानला जातो. 

अर्थात, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाबाबत भाजपमध्ये "अत्यंत कडक मौन' पाळले जात आहे व त्यामुळेच केवळ अंदाज व्यक्त करण्यावरच भर दिला जात आहे. कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आज सायंकाळपर्यंत हाती आले आहे. 

संरक्षण, रेल्वे, वन आणि पर्यावरण, गृहनिर्माण आणि नगरविकास, कृषी अशी खाती रिक्त झालेली असल्याने प्रथम त्या खात्यांना मंत्री शोधण्याबरोबरच दुसऱ्या फळीतील फेरबदलांच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले जाते.

 आज दिवसभर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. त्यामध्ये सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वेची जबाबदारी काढून घेण्यात आली, तरी त्यांना दुसऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाईल असे मानले जाते. कदाचित संरक्षण किंवा पर्यावरण आणि वन विभागासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

 रेल्वे मंत्रालय संयुक्त जनता दलाकडे द्यायचे नाही असे ठरविण्यात आल्यास, सध्या या खात्यात राज्यमंत्री असलेल्या मनोज सिन्हा यांनाच तेथे बढती दिली जाऊ शकते. मनोज सिन्हा यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद शेवटच्या क्षणी हुकले होते व भूमिहार असलेले ते भाजपचे उत्तर प्रदेशातले एक तालेवार नेते मानले जातात आणि विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या ते मर्जीतले आहेत व त्यामुळेच त्यांचे नाव प्रथम मुख्यमंत्रिपदासाठी विचारात घेण्यात आले होते. 

भाजपमध्ये नवे व तरुण चेहरे भरपूर आहेत; पण अनुभवाचा अभाव ही काहीशी पक्षाची पडती बाजू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार असल्याचे मानले जात असल्याने अंमलबजावणीची क्षमता असलेल्यांना मंत्रिपदासाठी प्राधान्याने विचारात घेतले जाणार आहे.

 अर्थात, कामाच्या धडाडीला प्राधान्य असेल; पण फाजील उत्साहीपणाला फाटा दिला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळेच राजीवप्रताप रुडी यांचे खाते गेल्याचे मानले जाते. 

कलराज मिश्र यांनी वयाची 75 वर्षे पार केलेली आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना जीवदान मिळालेले होते; पण आता मात्र त्यांची गच्छंती निश्‍चित आहे. महेंद्रनाथ पांडे या अन्य ब्राह्मण नेत्याला उत्तर प्रदेशात प्रदेश अध्यक्ष केल्याने या समाजाची मर्जी राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

अण्णा द्रमुकचे संसदीय गटनेते व लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबी दुराई यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतल्याचे समजले. त्यानंतर बोलताना त्यांनी त्यांच्या भेटीचा मंत्रिमंडळ फेरबदलाशी संबंध नाही असे सांगितले आणि अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात सामील होण्यात रस नसल्याचे सांगितले. 
 

संबंधित लेख