captal Punishmet for 3 in Nayana Pujaji Murder Case | Sarkarnama

नयना पुजारी खून प्रकरण- तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा

महेंद्र बडदे
मंगळवार, 9 मे 2017

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बस थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक केली होती.

पुणे - पुण्यातील साॅफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्या खून प्रकरणात पुण्यातील न्यायालयाने तिघाही आरोपींना विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी फाशीची शिक्षा आज सुनावली. या तिघांनाही काल दोषी ठरविण्यात आले होते.

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बस थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश राऊत मधल्या काळात ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला नंतर पुन्हा अटक करण्यात आली. राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार बनला.

काल कोर्टाने नोटीस बाजावल्याने आज आरोपीना सकाळी पावणे दहाला कोर्टासमोर हजर करण्यात आले.सकाळी 11 वाजता कोर्ट हॉल मध्ये आरोपी हजार झाले. कोर्टाची सुनावणी सुरु झाल्यावर आरोपीना शिक्षेबाबत काही सांगायचे आहे काय, असे विचारले.
आरोपी योगेश राऊतने राजेश चौधरीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच चौधरीलाही शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.आपल्याला पत्नीव मुलगी आहे, त्याचा विचार करून दया दाखवून कमी शिक्षा द्यावी हे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले.त्यानंतर महेश ठाकूरला शिक्षेबाबत विचारले असता तो काहीही बोलला नाही त्यानंतर विश्वास कदमला विचारणा करण्यात आली, त्यानेही राजेश दोषी असून त्यालाही शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

विशेष सरकारी वकिल हर्षद निंबाळकर यांनी युक्तीवादात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा करताना निंबाळकर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे निकालाचे दाखले दिले. बच्चीसिंग, वसंत तुपारे, पुरुषोत्तम बोराटे, उत्तर प्रदेश राज्य सरकार विरुद्ध सतीश खटला, मुंबई उच्च न्यायालयातील शंकर खाडे खटला आदीचा दाखला त्यांनी दिला. गुन्ह्याची हकीकत सांगून निंबाळकर यांनी हा गुन्हा किती अमानवी असल्याचे न्यायालयाला दाखवून दिले.

''असहाय असलेल्या पुजारी आरोपींकडे याचना करीत होत्या, सोडून देण्याची मागणी करीत होत्या,  परंतु आरोपीना दया आली नाही. त्यांनी राक्षसी कृत्य सुरुच ठेवले. या घटनेमुळे काम करणार्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हा गुन्हा उघड होउ नये म्हणुन त्यांनी तिचा खुन केला. आयटी क्षेत्रात महीला रात्रपाळीत काम करतात, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला, केवळ पुजारीच नाहीतर काम करणार्या प्रत्येक महिलांच्या कुटुंबियामध्ये भीती निर्माण करणारा हा गुन्हा आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असतानाच,  त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनातील वाढ कायदे तयार करणाऱ्यांसमोर चिंता आहे.'', असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. हा गुन्हा दिल्लीतील 'निर्भया' आणि पुण्यातीलच ज्योतीकुमारी या प्रकरणांपेक्षा गंभीर असल्याने आरोपींना फाशीच द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ती मान्य करुन न्यायालयाने तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

 

 

 

संबंधित लेख