canada council in pandharpur | Sarkarnama

कॅनडाचे कौन्सिल जनरल पंढरपूरला येणार! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीपूर्ण संबंधांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाकडून पंढरपूरच्या विकासासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये अत्यल्प व्याजदराने दिले जाणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी दिली. येत्या 3 ऑक्‍टोबरला कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ही हे त्यांच्या पथकासह पंढरपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

पंढरपूर : भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीपूर्ण संबंधांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाकडून पंढरपूरच्या विकासासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये अत्यल्प व्याजदराने दिले जाणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी दिली. येत्या 3 ऑक्‍टोबरला कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ही हे त्यांच्या पथकासह पंढरपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

आषाढी एकादशीदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर कॅनडा सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी निधी दिला जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता.22) मुंबईत या संदर्भातील बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य अवर सचिव प्रवीणसिंह परदेशी, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ही, डॉ.अतुल भोसले उपस्थित होते. 

पंढरपूरची आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्ते, वाहतूक व्यवस्था, वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था यासह पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला या बैठकीत रिव्ही व त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. 
कॅनडा सरकारचे पथक पंढरपूरचा अभ्यास करून आराखडा करेल. त्यानंतर वारकरी, महाराज मंडळी, स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यामध्ये आवश्‍यक ते बदलही केले जाणार आहेत. त्यानंतर सामंजस्य करार केला जाईल व त्यानंतर या कामांना सुरवात होईल. पंढरपूरचा चेहरामोहरा बदलून पंढरपूरला स्मार्ट शहर बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅनडा सरकारच्या या प्रकल्पामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र देशात "स्मार्ट शहर' म्हणून नावारूपाला येईल, असा विश्‍वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख