Can Uday Samant give shivsena new life in Pune? | Sarkarnama

पुण्यातील शिवसेनेचा कारभार उदय सामंतांना झेपणार? 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे : शिवसेनेच्या पुण्याच्या संपर्क प्रमुखपदी अखरे माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे आमदार उदय सामंत यांची नियुक्ती झाली. पुण्यात शिवसेनेने एवढे प्रयोग केले. पण एकाही संपर्कप्रमुखाने प्रभावशाली म्हणावी अशी कामगिरी गेल्या काही वर्षांत केलेली नाही. उलट सध्या शिवसेनेची निचांकी कामगिरी पुण्यात नोंदविली आहे. त्यामुळे सामंत यांना पुण्याचा कारभार झेपणार का, असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

पुणे : शिवसेनेच्या पुण्याच्या संपर्क प्रमुखपदी अखरे माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे आमदार उदय सामंत यांची नियुक्ती झाली. पुण्यात शिवसेनेने एवढे प्रयोग केले. पण एकाही संपर्कप्रमुखाने प्रभावशाली म्हणावी अशी कामगिरी गेल्या काही वर्षांत केलेली नाही. उलट सध्या शिवसेनेची निचांकी कामगिरी पुण्यात नोंदविली आहे. त्यामुळे सामंत यांना पुण्याचा कारभार झेपणार का, असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 
सामंत हे नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा येत्या सात जून रोजी पुण्यात येत आहेत. त्यात ते पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. सामंत हे 2014 पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांचे विश्‍वासू म्हणून त्यांचा परिचय होता. नगरविकास खात्याचे राज्यमंत्रिपदही पक्षाने त्यांच्याकडे दिले होते. मात्र स्थानिक समीकरणांमुळे सामंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजीनामा ठोकला. ते अजित दादांच्या एवढ्या जवळ होते की ते राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याची बातमी जवळच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा अजित पवारांना सांगितली तेव्हा त्यांचा त्यावर विश्‍वास बसला नाही. "दादा, टिव्ही चॅनेलवर बातमी सुरू आहे,' असे या कार्यकर्त्याने सांगितल्यावरही टिव्हीवाले काहीही बातम्या देतात. उदय पक्ष सोडू शकतच नाही, अशीही प्रतिक्रिया दादांनी दिली होती. एवढा विश्‍वास असलेल्या सामंतांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. 

शिवसेनेत आल्यानंतर पक्षात महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होता. शिवसेनेने भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर सुरवातीला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी सामंतांनी प्रयत्न केले होते. तेव्हा ते शक्‍य झाले नाही. शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली. तेव्हा मंत्रिपद मिळण्याची सामंतांना अपेक्षा होती. ते देखील साध्य झाले नाही. तेव्हापासून सामंत फारसे सक्रिय नव्हते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या किंवा शिवसेना मंत्र्यांत बदल करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतरच सामंत यांचे नाव चर्चेत येत होते. आता मात्र पुण्यासारख्या राज्यातील क्रमांक दोनच्या शहरातील पक्षाची संपर्क प्रमुखाची सूत्रे सामंतांकडे देऊन त्यांना जबाबदारीचे काम दिले आहे. 

पुण्यात शिवसेनेने संपर्कप्रमुखपदी बरेच प्रयोग केले. रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, गजानन कीर्तीकर आणि डॉ. अमोल कोल्हे आदींनी या पदाची धुरा गेल्या काही वर्षांत सांभाळली. प्रत्येकाच्या कारकिर्तीत टप्प्याटप्प्याने पक्षाची कामगिरी रोडावत गेली. डॉ. कोल्हे हे अभिनेते असल्याने ते पक्षकार्यात वेळ देत नसल्याची तक्रार होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत पक्षाने आपटी खाल्ली. अर्थात यात एकटा दोष डॉ. कोल्हेंचा नाहीच. मात्र त्यांनीही पक्षाला फार काही दिले नाही. शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते सध्या सुस्तावलेले आहेत. कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना जागे करण्याचे काम सामंतांना करावे लागणार आहे. मनसेला आलेली मरगळ शिवसेनेच्या पथ्यावर पडू शकते. त्याचा फायदा घेण्यासाठी काही धोरणे राबवावी लागतील. मनसेकडे गेलेला काही वर्ग शिवसेनेकडे वळवावा लागेल. भाजपची आता पुण्यात पूर्ण सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. "तडजोड'वादी पक्ष म्हणून पुण्यातील मध्यमवर्गीय आता शिवसेनेकडे नाक मुरडत आहेत. ही प्रतिमा सामंत पुसू शकतील? 
शिवसेनेत नवीन रक्त येणेच थांबले आहे. साऱ्या जुन्या नेत्यांनी आपल्याच जवळच्या आणि नात्यगोत्यांतील मंडळींना प्रोजेक्‍ट केले आहे. त्यामुळे तरुणांची शिवसेना हे समीकरण पुन्हा सामंतांना जुळवावे लागणार आहे. आगामी काळात कोणतीच निवडणूक नाही. थेट लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामंतांना नियोजन करावे लागणार आहे. संपर्कप्रमुख म्हणजे केवळ फोटोपुरते, असे समीकरण त्यासाठी त्यांना सोडावे लागेल. पक्षाचे बालेकिल्ले म्हणविणारे मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहेत. ते भाजपच्या हातून खेचणे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळेच पक्षाचे पुण्यातील अस्तित्त्व पणाला लागले आहे. हे अस्तित्त्व टिकविण्याची कामगिरी तरी सामंत पार पाडतील ना? 

संबंधित लेख