can punekar accept pruthviraj chavan | Sarkarnama

पुणे लोकसभेसाठी काॅंग्रेसचे `पृथ्वी` अस्त्र!

संजय मिस्किन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मुंबई : काॅग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी  धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पारदर्शक व स्वच्छ चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले जाण्याची शक्यता असून त्याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.

मुंबई : काॅग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी  धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पारदर्शक व स्वच्छ चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले जाण्याची शक्यता असून त्याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.

पुणे लोकसभा हा चाणाक्ष मतदारांचा मतदारसंघ मानला जातो. त्यातच आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले मतदार इथे बहुल आहेत. सभ्यता व पारदर्शकतेला इथला मतदार कौल देतो अशी परंपरा असल्याने काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची रणनिती असल्याचे मानले जाते.

पुणे शहरात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा सुजाण युवा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा या उच्चशिक्षित वर्गात सभ्य व पारदर्शक राजकिय नेता अशी अाहे. या मतदारांवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाची छाप पडू शकते अशी अटकळ बांधली जात आहे. त्याच वेळी दिल्लीत राहूल गांधी यांना विश्वासू व अनुभवी राष्ट्रीय राजकारण व प्रशासनाची जाण असलेल्या नेत्यांची मजबूत फळी उभी करायची आहे. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या राजकारणातून पुन्हा दिल्लीत सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचाही मागील दिड-दोन वर्षापासून पुणे काँग्रेसमधला वावर व संपर्क वाढल्याचा दाखला देत आगामी लोकसभेचे तेच उमेदवार होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून विनायक निम्हण व राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र पक्षांतर्गत अहवालासह काही खासगी कंपन्याकडूनही मतदारसंघाची मानसिकता पडताळणी सुरू अाहे. 2014 मधे काँग्रेसच्या वतीने विश्वजित कदम या युवा चेहऱ्याला इथे संधी दिली होती. मात्र मोदी लाटेत पुण्यासारख्या मतदारसंघात त्यांचा निभाव लागला नाही.

सध्या 2014 ची परिस्थीती नसून शहरी मध्यमवर्ग व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे डोळसपणे पाहणाऱ्या उमेदावाराला पुणेकर मतदार कौल देवू शकतो असा विश्वास असल्यानेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असल्याची माहिती आहे.

अर्थात या प्रस्तावाला खुद्द चव्हाण हे कितपत अनुकूल राहतील, याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यांच्या नावाची पुण्यासाठी या आधी चर्चा झाली होती. तेव्हा त्यांनी आपला स्वतःचा सातारा जिल्हा सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या या मतात बदल झाला आहे की नाही, हे आगामी काळात कळेल. 

 

संबंधित लेख